संग्रहित छायाचित्र
जमीन खरेदीसाठी माझ्याकडून एक लाख रुपये घेतलेत, त्यानंतर आता कागदपत्र करून देण्यास टाळाटाळ होत आहे, सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या या आणि अशा अनेक प्रकारच्या तक्रार अर्जांवर पोलिसांनी समोरच्या व्यक्तीला (गैरअर्जदार) तंबी दिली. त्यानंतर संबंधितांनी अवघ्या काही तासांतच पैसे माघारी दिले. उपायुक्त दर्जाच्या आधिकऱ्यांनी तक्रार निवारण दिनासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांशी प्रत्यक्ष साधून तब्बल पाच हजार ४७३ जणांचे समाधान करत तक्रारी अर्ज निकाली काढल्याची नोंद आहे.
पिंपरी- चिंचवड शहर परिसर झपाट्याने विकसित होत आहे. शहरात येणाऱ्या कामगार वर्गाची संख्याही मोठी आहे. ज्यामुळे किरकोळ कारणावरून भांडणाचे प्रकारही वरचेवर घडत असतात. तसेच, आर्थिक फसवणूकीच्या प्रकारातही वाढ होत आहे. यातूनच एकमेकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या अर्जाचा निपटारा करताना स्थानिक पोलिसांची मोठी दमछाक होते. या वाढत्या तक्रारी अर्जांचा विचार करून पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन आयोजित करण्याचे आदेश दिले. त्यासाठी उपायुक्त दर्जांच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. पोलीस ठाण्यात प्रलंबित असलेल्या अर्जांची छाननी करून संबंधित अर्जदारांना तक्रार निवारण दिनाच्या दिवशी बोलवले जाते. तक्रार निवारण दिनासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांशी उपायुक्त दर्जाचे अधिकारी स्वतः प्रत्यक्ष संवाद साधतात. त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यावर तोडगा काढला जातो. बहुतांश प्रकरणात जागेवरच तोडगा निघतो. ज्यामुळे तक्रारदाराचे समाधान होते. अशा प्रकारे उपायुक्त दर्जाच्या आधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष संवाद साधून मागील सहा महिन्यांत तक्रार निवारणासाठी बोलवलेल्या पाच हजार ४७३ जणांचे समाधान झाल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे.
तपास आधिकाऱ्यांसह वरिष्ठ निरीक्षकही हजर
तक्रार निवारण दिनाच्या दिवशी अर्जदार आणि गैरअर्जदार यांना आवश्यक कागदपत्रांसह हजर राहण्याच्या सूचना दिल्या जातात. यावेळी संबंधित अर्जाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यास देखील उपस्थित असणे बंधनकारक असते. उपायुक्त दर्जाचे अधिकारी अर्जदार, गैरअर्जदार यांचे म्हणणे ऐकून घेत असताना तपास अधिकाऱ्यासह वरिष्ठ निरीक्षकाचे मतही विचारात घेतले जाते.
एक घाव दोन तुकडे
बहुतांश प्रकरणात स्थानिक पोलीस अर्ज प्रकरणातील चौकशीचे भिजत घोंगडे ठेवतात. त्यामुळे प्रलंबित अर्जांचा आकडा फुगत जातो. उपायुक्त दर्जाचे अधिकारी संबंधित प्रकरणात एक घाव दोन तुकडे करतात. गुन्हा दाखल होत असल्यास तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले जातात. अन्यथा पोलिसांच्या अखात्यारीत प्रकरण येत नसल्याचे समजावून सांगून तक्रारदारास इतर यंत्रणेकडे दाद मागण्यास सांगितले जाते. त्यासाठी कायदेशीर मार्गदर्शनही केले जाते.
आठ दिवस आधीपासून केली जाते तयारी
पोलीस ठाण्यातील प्रलंबित अर्जांची संख्या कमी करण्यासाठी तक्रार निवारण दिनाची संकल्पना सामोर आणण्यात आली. स्थानिक पोलीस आठ दिवस आधीपासूनच तक्रार निवारण दिनाची तयारी करतात. अर्जांची छाननी करून 'अ' आणि 'ब' अशी वर्गवारी केली जाते. त्यानंतर संबंधित अर्जदाराला संपर्क करून तक्रार निवारण दिनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले जाते.
काही प्रकरणात तडजोड
तक्रार निवारण दिनासाठी उपस्थित असलेल्या तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पोलीस अधिकारी निर्णय घेतात. बहुतांश प्रकरणात अतिशय किरकोळ कारणातून तक्रारी अर्ज केल्याचे समोर येते. तसेच, काही प्रकरणात गैरसमजातून देखील अर्ज केल्याचे सांगितले जाते. अशा प्रकरणांमध्ये पोलीस अधिकारी दोन्ही बाजू ऐकून घेऊन समेट घडवून अर्ज निकाली काढतात.
प्रलंबित अर्जांची वाढती संख्या विचारात घेऊन पोलिस ठाणे स्तरावर तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येते. उपायुक्त दर्जाचे अधिकारी तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतात. पोलिस अधिकाऱ्यांकडून संबंधित तक्रारदारांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला जातो. मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड
तक्रार निवारण दिनाची मागील सहा महिन्यांची आकडेवारी
आमंत्रित तक्रारदार - ११, १०२
उपस्थित राहिलेले अर्जदार - ६,११४
अर्ज निर्गती संख्या (समाधान झालेले नागरिक) - ५,४७३
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.