संग्रहित छायाचित्र
मावळ विधानसभा मतदारसंघाचे सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी पवन मावळातील गावांमध्ये प्रचारदौरा केला. या दौऱ्यात गावोगावी महिलांनी तक्रारीचा पाढा वाचला.
पाणी समस्या, रस्त्याच्या समस्या आदी समस्या मांडत आमदार शेळके यांनी कामे केलीच नसल्याचे सांगितले. दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत केलेली कामेही अर्धवट व निकृष्ट दर्जाची झाली आहेत. जलजीवन मिशनसाठी वापरल्या गेलेल्या पिव्हीसी पाईपचे नमुनेच ग्रामस्थांनी भेगडे यांच्यासमोर सादर केले.
बापू भेगडे यांनी जवन नं १-२-३, अजिवली, वाघेश्वर, कादव, शिळींब, चावसर, विठ्ठलवाडी, मोर्वे, तुंग, कोळे चाफेसर, आतवन, टायगर पॉईंट, ओळकाईवाडी, कुसगाव, कुसगाववाडी, औंढोली, औंढे, डोंगरगाववाडी, डोंगरगाव, केवरे वसाहत आदी गावांना भेटी देत पिपाणी चिन्हा समोरील बटण दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी महिलांनी औक्षण करीत नक्की विजयी व्हाल असे आशीर्वाद दिले.
यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, माजी सभापती माऊली दळवी, भाजपा मावळ तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गुंड, मनसेचे तालुकाप्रमुख रुपेश म्हाळसकर, शिवसेना तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव वरघडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, नरेंद्र ठाकर,गणेश धानिवले,नामदेव पोटफोडे, नंदकुमार धनवे, सरपंच नारायण बोडके, संदिप पाठारे आदी उपस्थित होते.
भाऊसाहेब गुंड म्हणाले, की बापूसाहेब भेगडे यांच्या रूपाने मावळ तालुक्याला दमदार आमदार लाभल्यास त्यांच्या निधीमधून लोणावळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामे करत सर्व भौतिक सुविधा नागरिकांना पुरवण्यात येतील. आशिष ठोंबरे यांनीही या सर्व भागातून मोठे मताधिक्य देण्याचा विश्वास व्यक्त केला.
पाणी प्रश्न गंभीर असून, माता भगिनींचे पाण्याअभावी प्रचंड हाल होत आहेत. आमदार पाण्याचा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत केलेली कामेही अर्धवट व निकृष्ट दर्जाची केली आहेत. अशा पैसेखाऊ वृत्तीमुळे नागरिकांना पाण्याच्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. म्हणजे पैशापुढे यांना जनतेची सुख-दुःखेही दिसेनाशी झाली आहेत. मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास हे आपले ध्येय आहे.
- बापूसाहेब भेगडे, अपक्ष उमेदवार
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.