संग्रहित छायाचित्र
औद्योगिक परिसरातील चोर्या तसेच इतर घातपाती कारवाया रोखण्यासाठी आता कंपनी, शॉपलगतच्या परिसरातील रस्तेही कव्हर होतील, या पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. पोलिसांनी केलेल्या सूचनांनुसार, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील सर्व कंपन्या, शॉप व इतर औद्योगिक आस्थापनांना याबाबत पत्रकाद्वारे स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
भोसरी एमआयडीसीतील एस. जे. डब्ल्यू आणि टी ब्लॉक, पिंपरीतील एफ २, एच ब्लॉक, चिंचवड मधील डी १, डी २ आणि डी ३ हे सर्व ब्लॉक तसेच, भोसरी औद्योगिक परिसरातील सेक्टर ७ आणि १०, शांतीनगर, चिखली, कुदळवाडी, तळवडे, ज्योतिबानगर, शेलारवस्ती-चिखली, चोविसावाडी-चर्होली, बारणेवस्ती-मोशी अशा प्रचंड मोठ्या प्रमाणात पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक पट्टा विस्तारलेला आहे. या औद्योगिक परिसरातील बहुतांशी कंपन्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु, हे कॅमेरे कंपन्यांच्या आतील बाजूस असतात. कंपनीलगतचे मुख्य, अंतर्गत रस्तेही त्या कॅमेर्यांमध्ये येणे गरजेचे असते. अनेकदा अपघात, घातपाताचे प्रकार घडतात. याशिवाय कंपनीतून घरी सुटल्यानंतर कामगारांकडील मोबाईल फोन, पगाराची रोकड लुटून नेण्याचे प्रकारही सातत्याने घडतात.
मात्र, घटनास्थळावरील कंपन्यांमध्ये रस्त्याच्या बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे अनेकदा निदर्शनास येते. त्यामुळे आरोपींचा माग काढणे पोलिसांनाही कठीण होते. ही बाब लक्षात घेऊन भोसरी एमआयडीसी पोलिसांनी लघुउद्योग संघटनेच्या पदाधिकार्यांसमवेत नुकतीच बैठक घेतली. औद्योगिक परिसरातील गुन्हे रोखण्यासाठी कंपनी, शॉपसमोरील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच, आपल्या आस्थापनेसमोरील रस्तेही कव्हर होतील, अशा प्रकारे चांगल्या प्रतीचे कॅमेरे बसवावेत, अशा सूचना करण्यात आल्या.
त्या अनुषंगाने लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. औद्योगिक परिसरामध्ये चोर्या, गुन्हे तसेच दहशतवादी कारवाया, समाज कंटकाकडून घातपाती कृत्ये घडू नये याकरिता सुरक्षिततेच्या व कायदा - सुव्यवस्थेच्या अनुषंगाने औद्योगिक आस्थापना, कंपनी, शॉपसमोरील परिसर व रस्ते कव्हर होतील, अशाप्रकारे चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे किमान ३० दिवसांपर्यंत स्टोअरेज क्षमतेसह बसवण्यात यावे, कॅमेरे बसवण्यापूर्वीचे व बसवल्यानंतरचे फोटो काढून जुन्या व नवीन बसवण्यात आलेल्या कॅमेर्यांच्या माहितीसह भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील संतोष फावडे (९९२३१२४१०५) व लघुउद्योग संघटनेचे औटी (९८८१४५०२२५) यांना कळवण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात लघुउद्योग संघटनेच्या पदाधिकार्यांसमवेत नुकतीच बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पोलीस अधिकार्यांनी औद्योगिक परिसरातील चोर्या तसेच इतर घातपाती कारवाया रोखण्यासाठी कंपनी, शॉपसमोरील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच, आपल्या आस्थापनेसमोरील रस्तेही कव्हर होतील, अशा प्रकारे चांगल्या प्रतीचे कॅमेरे बसवावेत, अशा सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने शहरातील सर्व कंपन्या व लघुउद्योजकांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना
पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील आस्थापना, कंपन्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत वरिष्ठांकडून वेळोवेळी सूचना दिल्या जातात. पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात कारखाने तसेच लघुउद्योगही मोठ्या प्रमाणात आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून औद्योगिक परिसरातील कंपनी, शॉपमध्ये सीसीटीव्ही असणे उद्योजकांच्या दृष्टीने फायद्याचे आहे. तसेच, एखादा गुन्हा घडल्यास सीसीटीव्हीमुळे आरोपींचा तपास करताना पोलिसांनाही मोठी मदत होते. त्यामुळे लघुउद्योग संघटनेच्या पदाधिकार्यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
- गणेश जामदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी एमआयडीसी
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.