संग्रहित छायाचित्र
राज्यामध्ये २०१९ पूर्वीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) शहरातील २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना ३१ मार्चपर्यंत एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहन केले आहे. आरटीओने याबाबतचे आदेश काढले असून, अशा वाहनांची माहितीदेखील काढण्याचे काम आरटीओच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.
देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन/नंबर प्लेट देणे बंधनकारक केले होते. याबाबतचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २०१८ मध्ये दिले होते. तसेच २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनाला दिले होते. या अधिकारांतर्गत दिल्लीसह अनेक राज्यांनी एसएसआरपी बंधनकारक केले आहे. पण, महाराष्ट्र राज्यात अजूनही २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक करण्यात आलेले नव्हते, पण आता राज्य परिवहन विभागाने राज्यातील २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना ३१ मार्चपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावून घेणे बंधनकारक केले आहे. पिंपरी-चिंचवड आरटीओसाठी खासगी एजन्सीची नियुक्ती केली आहे. या एजन्सीमार्फत पिंपरी-चिंचवड आरटीओच्या हद्दीत पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, मावळ आणि लोणावळा तालुक्यांत वाहनांना नंबरप्लेट लावण्यात येणार आहे. दरम्यान, याकडे दुर्लक्ष केल्यास आरटीओच्या वतीने दंडात्मक कारवाईही करण्यात येणार आहे.
हाय सिक्युरिटी नंबरप्लेटचे शुल्क आकारणार
या नियमानुसार आता दुचाकीपासून ते चारचाकी मोटारीपर्यंत सर्वच वाहनांना या नंबरप्लेटसाठी पैसे आकारण्यात येणार आहेत. त्यासाठी आता दुचाकीसाठी ४५०, तीनचाकी साठी ५०० तर, मोटारीसाठी ७४५ पैसे आकारण्यात येणार आहेत. त्यासाठी वाहनचालकांना जुन्या वाहनांना त्यांची कागदपत्रे तपासून ही नंबर प्लेट लावून मिळणार आहे.
काय आहे प्रक्रिया?
वाहन विभागाच्या transport.maharash tra.gov.in या संकेतस्थळावर नंबरप्लेट बुकिंग पोर्टल लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या बुकिंग पोर्टलवर नोंदणी करून स्लॉट बुकिंग करावे लागणार आहे. शहरातील वाहनांसाठी एजन्सीची नियुक्त्ती केली आहे. या एजन्सीमार्फत शहरातील वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्यात येणार आहेत. नागरिकांनी ३१ मार्चपूर्वी या नंबरप्लेट बसवून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.