महापालिकेच्या क्रिडा विभागाकडून इंद्रायणीनगर (भोसरी) येथील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडासंकुलात सिंथेटिक ट्रॅक (कृत्रिम धावमार्ग) बदलण्याचे काम सुरू होते. हे काम गेल्या वर्षभरापासून संथ गतीने सुरू होते. त्यामुळे शहरातील ॲॅथलेटिक्स खेळाचा सराव करणाऱ्या १५० राज्यस्तरी खेळाडू, तर ५० राष्ट्रीय खेळाडूंची गैरसोय होत होती. अखेर एका वर्षानंतर हा ट्रॅक शुक्रवारपासून (१५ मार्च) खेळाडूंसाठी खुला करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील ॲॅथलेटिक्स खेळाचा सराव करणाऱ्या खेळाडूंसाठी शहरातील हे एकमेव मैदान आहे. या ठिकाणी ४०० मीटरचा आठ लेनचा सिंथेटिक ट्रॅक आहे. अनेक वर्षांपासून ट्रॅकवर खेळाडूंचा नियमित सराव, विविध स्पर्धामुळे बाहेरील वातावरणामुळे जुना ट्रॅक खराब झाला होता. वर्षभरापूर्वी जुना सिंथेटिक ट्रॅक बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे चार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. क्रीडा संकुलातील ट्रॅकवर सकाळी आणि सायंकाळी या दोन सत्रांत अनेक खेळाडू मैदानी स्पर्धेचा सराव करत होते. या खेळाडूंना सरावासाठी ट्रॅकच उपलब्ध नसल्याने त्यांना इतर ठिकाणी सराव करावा लागत होता. सिंथेटिक ट्रॅकवर सराव करता न आल्याने त्याचा थेट परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर झाला होता. या ट्रॅकच्या कामाला विलंब झाल्याने खेळाडूंचे नुकसान झाले.
दरम्यान सिंथेटिक ट्रॅक तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. साईड पट्या, लाँग जम्प आणि आऊटलेट काढणे अशी किरकोळ कामे होणे बाकी आहे. मात्र, खेळाडूंची गैरसोय होत असल्याने आणि ट्रॅक खुला करण्यास कोणतीही अडचण नसल्याने शुक्रवारपासून (१५ मार्च) ट्रॅक खुला करण्यात येणार आहे. किरकोळ कामे त्वरीत पूर्ण करण्याच्या स्थापत्य विभागाला सुचना दिल्या आहेत, असे क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.