आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे छत ढासळले, एक जखमी
रोहित आठवले
आदिवासी विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या शासकीय मुलींच्या वसतिगृहाच्या छताच्या प्लास्टरचा काही भाग कोसळून एक विद्यार्थिनी जखमी झाली. गुरुवारी (५) ऑक्टोबर) सायंकाळी वाकडच्या वेणूनगर भागात ही घटना घडली. अनिता गेनो पधवे असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. शासनातर्फे वाकड वेणूनगर भागात निवासी मुलींचे वसतिगृह चालवले जाते.
जिल्ह्यासह राज्यातील काही विद्यार्थिनी येथे राहण्यास आहेत. चार वर्षांपूर्वी ही इमारत उभारण्यात आली आहे. सायंकाळी अनिता ही २७ क्रमांकाच्या खोलीत झोपली असताना, अचानक छताच्या प्लास्टरचा काही भाग तोंडावर कोसळला. यामध्ये अनिता हिच्या कपाळाला दुखापत झाली आहे. अनिता हिच्यासह यावेळी खोलीत काही विद्यार्थिनी होत्या. त्यांनी तत्काळ ही माहिती वसतिगृहाच्या अधीक्षकांना दिली. त्यानंतर अनिताला नजीकच्या दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी यावेळी इमारतीची पूर्ण पाहणी केली. छताच्या प्लास्टरच्या काही भागाव्यतिरिक्त अन्यत्र काही गडबड झाली नाही ना, याची तपासणी पोलिसांनी केली. दरम्यान, अनिता हिच्या कुटुंबीयांकडून कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांकडे याबाबत कोणत्याही प्रकारची नोंद केलेली नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील घटनास्थळाची पाहणी केली.
प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड म्हणाले की, अनिता हिला किरकोळ दुखापत झाली आहे. तिच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. तिची बहीण पुण्यातच राहात असून, तिला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर अनिता पुढील काही दिवसांसाठी कुटुंबीयासमवेत राहण्यासाठी घरी गेली आहे. घटना कशी घडली याबाबत अहवाल मागविण्यात आला आहे. पावसामुळे छताच्या प्लास्टरचा भाग पडला असण्याची शक्यता आहे. चौकशीनंतर आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.