Pimpri Chinchwad: मामुर्डी ते वाकडपर्यंत सेवा रस्त्यालगत वृक्ष लागवड करावी; नागरिकांची मागणी

पुणे-बेंगलोर (एनएच-४८) महामार्गालगत (Pune Benglore Highway) अनेक ठिकाणी गृह प्रकल्पाची कामे, आर.एम.सी प्लांट सुरू आहेत. सतत मालवाहू अवजड वाहनांची वर्दळ आहे. त्यामुळे मामुर्डी ते वाकड परिसरात प्रचंड धूळ,

संग्रहित छायाचित्र

धुळीच्या साम्राज्याने प्रदूषणात वाढ, महामार्गालगत वृक्षारोपण करावे

पुणे-बेंगलोर (एनएच-४८) महामार्गालगत (Pune Benglore Highway) अनेक ठिकाणी गृह प्रकल्पाची कामे, आर.एम.सी प्लांट सुरू आहेत. सतत मालवाहू अवजड वाहनांची वर्दळ आहे. त्यामुळे मामुर्डी ते वाकड परिसरात प्रचंड धूळ, वाहनांची धूर, कच-याने हवा प्रदूषणात वाढ झाली आहे. यामुळे महामार्गालगत राहणाऱ्या सोसायटीधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकरिता महापालिका हद्दीतील वाकड (Wakad) ते मामुर्डी (Mamurdi) पर्यंत सेवा रस्त्यालगत वृक्षारोपण करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांतून होत आहे. (Pimpri Chinchwad News)

पिंपरी-चिंचवड शहरातून जाणारा पुणे-बेंगलोर (एनएच-४८) महामार्गावरच्या सेवा रस्त्यालगत सध्यस्थितीत एकही झाड दिसून येत नाही. शहरातील वाकड, रावेत, ताथवडे, पुनावळे, किवळे, मामुर्डी ह्या भागात धूळ, धूर, कचरा मोठ्या प्रमाणात होऊन हवा प्रदूषण वाढत आहे. पूर्व-पश्चिम वाहणारे वारे, वाढलेली वाहतूक, महामार्गालगत आजूबाजूला नवीन होणारी  बांधकामे, रस्त्याचे सातत्याने चालू असलेले काम, अनेक भागातील आरएमसी प्लांट यामुळे महामार्गावर धुळीचे साम्राज्य वाढत चालले आहे. महामार्गावर वाहनांतून निघणारा धूरदेखील वाहनचालकांना हैराण करत आहे.

सद्यस्थितीत वाकड ते मामुर्डी महामार्गालगत देशी झाडे कुठेही दिसत नाहीत. केवळ खुरटी झुडपे आणि गवत दिसत आहे. झाडे नसल्याने विद्रुपीकरण वाढत आहे. महामार्गालगत आवश्यक वृक्षारोपण यापूर्वीच करायला हवे होते, पण रस्ते विकास आणि देखभाल करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांनी याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे सेवा रस्त्यालगत झाडे लावून ती जगवण्याचा विसर त्या कंपन्यांना पडला आहे. त्याकरिता विसर पडलेल्या संबंधित यंत्रणांना वृक्षारोपण करण्याचे स्मरण नागरिकांकडून केले जात आहे.

दरम्यान,  महामार्गालगत वृक्षारोपण करण्यास आवश्यक सुविधा उपलब्ध केल्यास शहरातील पर्यावरणप्रेमी, जागरूक नागरिक देखील या मोहिमेत सहभागी होऊन झाडे लावण्यास सहकार्य करतील, महामार्गालगत झाडे लावल्यास वायुप्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होईल. नागरिक देखील वृक्षारोपणास मदत करतील, अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांतून रस्ते आणि भूपृष्ठवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे.

जुना पुणे- मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडीपर्यंत पूर्वीपासून वृक्षसंपदा आहे. आता मेट्रोच्या कामांमुळे काही प्रमाणात झाडे कमी झाली आहेत.  रावेतच्या पुढे पुणे-मुंबई एक्सप्रेस वे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन योग्यप्रकारे केलेले आहे. या झाडांमुळे हवा प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यात मदत होऊन नागरिकांचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे वाकड ते मामुर्डी या पुणे - बेंगलोर महामार्गालगत सेवा रस्त्यावर वृक्षारोपण करावे, जेणेकरून धूळ, धुरांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.  

—गणेश बोरा,  पर्यावरणप्रेमी नागरिक

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest