खडकीतील वाहतूक कोंडी सुटेना; नेहमीच लागताहेत वाहनाच्या रांगा
पंकज खोले :
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराशी जोडला जाणारा खडकी भाग नेहमीच वर्दळीचा ठरलेला आहे. दोन्ही शहरातील नागरिकांची ये-जा, प्रवासी व अवजड वाहने आणि मालवाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक सेवा या सतत सुरू असलेल्या संख्येत गेल्या काही दिवसांत लक्षणीय वाढ होत आहे. मात्र, रस्त्याची अर्धवट कामे, नियोजनाचा अभाव, वाहतूक पोलिसांची अपुरी संख्या, कॅन्टोन्मेंट आणि महापालिका दोन्ही विभागाचा समन्वय नसणे यासह अनेक बाबींमुळे खडकीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे सकाळपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहनचालकांना या मार्गातून जाताना कोंडीचा सामना करावा लागतो आहे.
पुणे महापालिका, खडकी कॅन्टोन्मेंट आणि स्थानिक लष्करी प्राधिकरणाच्या प्रतिनिधींनी या रस्त्याचे पाहणी करून संबंधित वाहतुकीचा तिढा सोडवण्यासाठी सर्वेक्षण पूर्ण केले होते. पूर्वी खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीत अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे हा रस्ता रुंदीकरणासाठी हाती घेण्यात आला आहे. मात्र, त्याचे नियोजन अभाव असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. सकाळी दैनंदिन कामासाठी अथवा कार्यालयीन वेळेत पोहोचण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. शिवाजीनगरवरून अथवा दापोडी येथून या दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांचा वेग खडकी येथे आल्यास मंदावतो. या ठिकाणी सुरू असलेली कामे आणि वाहतुकीचे नियोजन योग्य नसल्याने कोंडीत अडकून पडावे लागते.
मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी बोपोडी चौक ते चर्च चौक या दरम्यानच्या वाहतुकीत मार्च २०२१ मध्ये बदल करण्यात आले होते. त्यानुसार बोपोडी चौकातून पुण्याकडे येणारी वाहने डावीकडे वळवण्यात आली होती. पुण्याकडे येणारी वाहतूक खडकी बाजार, खडकी बाजार बसस्थानक, अष्टविनायक मंदिर, मुळा रस्त्याने वळवण्यात आली होती. खडकी बाजारमधून जाणाऱ्या वाहनचालकांना खडकी रेल्वे स्थानक, बोपोडी चौकमार्गे पिंपरीकडे जावे लागत होते. बोपोडी चौक ते खडकी पोस्ट ऑफिस या दरम्यानचा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता खुला करण्यात आला. मात्र, रस्त्याचे रुंदीकरण आणि कॉंक्रिटीकरण सुरू असल्याने पुन्हा वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, खडकी येथील रेल्वे स्थानकापासून ते बोपोडी मेट्रो स्टेशनपर्यंत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. त्यातच पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने हा रस्ता धोकादायक झाला आहे. पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी भूमिगत चेंबरचे दोन झाकणे रस्त्याच्यावर आली आहेत. त्यामुळे दुचाकी सरकून मोठा अपघात होऊ शकतो. रस्त्यात खड्डे पडले आहेत.
पुण्याकडे जाताना दोन, पिंपरीकडे येताना तीन डायव्हर्जन
पुण्याच्या दिशेने खडकी चौक ते ऑल सेंट्स स्कूल या दरम्यान दोन ठिकाणी रस्ते वळवण्यात आले आहेत. तर, पिंपरीच्या दिशेने जाताना तीन ठिकाणी डायव्हर्जन आहे. त्यामुळे चार पदरी रस्ता पुन्हा अरुंद होतो. परिणामी, वाहनांचा वेग कमी होऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यातच या ठिकाणी वाहतूक पोलिसांचा एकही कर्मचारी अथवा वॉर्डन दिसून आला नाही.
व्यापाऱ्यांची सुटका, वाहनचालकांचे हाल
रस्ता रुंदीकरणामुळे हा मार्ग एकेरी करावा लागला होता. यामुळे खडकी मुख्य बाजार येथे अडचण निर्माण होत होती. त्याबाबत हा रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीस दुहेरी खुले झाल्याने खडकी बाजारातली व्यापारी, नागरिक यांना दररोजच्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे. मात्र, अर्धवट काम आणि वाहतूक कोंडी अद्याप सुटली नसल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत.
अन् रिक्षाचालकांनी केले वाहतूक नियमन
या रस्त्यावर खडकी रेल्वे स्थानकासमोर वाहतूक वळवण्यात आली आहे. तसेच, खडकी बाजारातून देखील वाहने या मार्गावर येतात. तिन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. बुधवारी प्रवासी बस अडकून पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. अखेर या ठिकाणी थांबलेल्या रिक्षा चालकाने रस्त्यावर उतरून वाहतूक नियमन केले. त्यामुळे काही अंशी वाहतूक मोकळी झाली होती.
या आहेत समस्या
- खडकी ते अंडी उबवणी केंद्र यादरम्यान अनेक ठिकाणी डायव्हर्जन
- खडकी बाजाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर खोदकाम
- वाहतूक नियमांची उल्लंघन, पोलिसांची अपुरी संख्या
- रस्ता रुंदीकरण, अर्धवट कामांचा फटका
- रुंदीकरणाचे साहित्य रस्त्यातच पडून
रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. जागा ताब्यात आली असून एक जुने थेटर पाडून रुंदीकरणाचे काम सुरू आहे. लष्करी विभागाला त्या बदल्यात जागाही देण्यात आली आहे. या ठिकाणी काँक्रिटीकरणाच्या तीन लेयर आहेत. दोन्ही बाजूचे काम पूर्ण झाल्यावर वाहतुक कोंडी होणार नाही. त्याचप्रमाणे रस्त्याची दुरुस्ती आणि देखभालही करण्यात येणार आहे.
-अमर शिंदे, वरिष्ठ अधिकारी, पथ विभाग, पुणे महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.