पर्यावरण संरक्षणासाठी काढली मशाल रॅली

पिंपरी-चिंचवड शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी तसेच, रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त पिंपळे गुरव परिसरात मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांचा मोठा सहभाग या रॅलीत पाहायला मिळाला.

पर्यावरण संरक्षणासाठी काढली मशाल रॅली

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिलांनी स्वयंस्फूर्तीने घेतला सहभाग, पालिका कर्मचाऱ्यांसह अबालवृद्धांचा प्रतिसाद

पंकज खोले:
पिंपरी-चिंचवड शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी तसेच, रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त पिंपळे गुरव परिसरात मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांचा मोठा सहभाग या रॅलीत पाहायला मिळाला. महापालिका 'ड' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आरोग्य कर्मचारीही या रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीनंतर सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली.

पिंपळे गुरव येथे तुळजाभवानी मंदिर ते राजमाता जिजाऊ उद्यानापर्यंत मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले. प्लास्टिक कॅरीबॅग वापरू नये, कापडी पिशव्यांचा वापर वाढवावा. होम कंपोस्टिंग करा, आपला परिसर कचरामुक्त करा, पर्यावरण संवर्धन वाढवा, अशा घोषणांबरोबरच रॅलीत सहभागी सर्वांना  स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

स्थानिक नागरिक अण्णा जोगदंड म्हणाले की, पर्यावरण वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची सध्या गरज आहे. प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. महापालिकेचे आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करावे. परिसरात कचरा होऊ देऊ नका. महिला दिनानिमित्त महिला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आत्मविश्वासने व धाडसाने कार्यरत आहेत. कोणत्याही क्षेत्रात महिला मागे राहिलेल्या नाहीत. याचीच प्रचिती या रॅलीत सहभागी महिलांनी दिल्याचे जोगदंड म्हणाले.  

यावेळी राजमाता जिजाऊ उद्यानासमोर पथनाट्यातून पर्यावरणविषयक जनजागृती करण्यात आली. अर्वी कांबळे या मुलीने मर्दानी खेळ खेळून उपस्थित्यांची मने जिंकली. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त सर्वांना जोगदंड यांनी सुरक्षिततेची शपथ दिली, तर पर्यावरणाची शपथ जयश्री आरणे यांनी दिली. यानंतर  मशाल रॅलीची सांगता करण्यात आली. महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक वाय. बी. फल्ले, संगीता जोगदंड, अरुण पवार, माजी स्थानिक नगरसेवक सुरेश सकट, राजू ओव्हाळ, सिद्धार्थ जगताप, अशोक सोनटक्के, रामेश्वर महाजन,वॉर्ड इनचार्ज स्वराज कांबळे, निकेश सरवदे, समाधान कांबळे, मारुती कांबळे, दीपक चौर, राहुल जाधव, राहुल चव्हाण,ऋतुजा पेडणेकर, डॉ. भूषण पेडणेकर, पल्लवी भाटे, अनेक महिला व नागरिक सहभागी झाले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest