...हा तर तमाम शंभुभक्तांच्या भावनांचा अपमान : डॉ. अमोल कोल्हे

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा विकास होतो आहे, त्यांचा फोटो कुठल्याही फ्लेक्सवर, जाहिरातींवर नसावा हा तमाम शंभुभक्तांचा, त्यांच्या भावनांचा अपमान आहे, अशा तीव्र शब्दांत खासदार

Dr. Amol Kolhe

...हा तर तमाम शंभुभक्तांच्या भावनांचा अपमान : डॉ. अमोल कोल्हे

फ्लेक्स, जाहिरातींमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो नसल्याने व्यक्त केला संताप

विकास शिंदे
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chatrapati Sambhaji Maharaj) समाधीस्थळाचा विकास होतो आहे, त्यांचा फोटो कुठल्याही फ्लेक्सवर, जाहिरातींवर नसावा हा तमाम शंभुभक्तांचा, त्यांच्या भावनांचा अपमान आहे, अशा तीव्र शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच हा भूमिपूजन सोहळा हा राजकीय इव्हेंट असल्याची टीका केली.

वढु बुद्रुक आणि तुळापूर येथील शौर्य तीर्थावर भूमिपूजन पार पडले. मात्र, मागील दोन दिवसांपासून या भूमिपूजन सोहळ्याचा वाद रंगलेला होता. तुळापूर येथे आयोजित जाहीर कार्यक्रमातून निघून जात खासदार डॉ. कोल्हे आणि आमदार अशोकबापू पवार यांनी नाराजी व्यक्त केली. या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, खरे तर नगरला छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत तेजस्वी इतिहास उलगडून दाखवणारे 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे प्रयोग होत आहेत. जवळपास १ लाख लोक हा प्रयोग 'याची देही याची डोळा' अनुभवताहेत. त्यामुळे मला नगरला वेळेत पोहोचणे गरजेचे होते. त्यामुळे आपण कार्यक्रमातून निघून गेल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले. त्याचबरोबर निधी दिला म्हणजे विकास होतो, अशी कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांची समजूत झाली असेल. निधी दिला तर त्यातून इमारत उभी राहते, पण स्मारकाची प्रेरणा ही जिवंत चैतन्यातून मिळते, हेच चैतन्य जागवण्यासाठी आता अहमदनगरमध्ये जात असल्याचे त्यांनी सांगितले.

१५ वर्षे खासदार असताना काय केले?

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या विकासासाठी भूमिपूजन सोहळा आयोजित केल्याबद्दल खासदार डॉ. कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना गेली ३३४ वर्षे ही समाधी, हे स्मारक या ठिकाणी असल्याची आठवण करून देताना काही लोक १५ वर्षे या भागाचे खासदार होते. स्वतः अजित पवार साडेतेरा वर्ष पालकमंत्री होते. त्यावेळी या स्मारकाचे काम का झाले नाही, असा सवाल खासदार डॉ. कोल्हे यांनी केला. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत तेजस्वी इतिहास १५७ देशांत पोहोचवण्यात खारीचा वाटा उचलू शकलो ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळेच २०१९ नंतर मी आणि आमदार अशोकबापू पवार यांनी सातत्याने या समाधी स्थळाचा विकास व्हावा यासाठी मागणी व पाठपुरावा सुरू केला, त्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर हे भूमिपूजन होत आहे, 

यासाठी मी मनापासून आभारी आहे. दुसरे म्हणजे कोनशिलेवर नाव नसले तरी काळजावर कुणाचे नाव कोरले आहे  हे मायबाप जनता जाणते, अशा शब्दांत कोनशिलेवरील नाव वगळण्याच्या प्रकाराचा समाचार घेतला. गेल्या दोन दिवसांपासून हा भूमिपूजन सोहळ्याचा वाद रंगलेला होता. या वादात कार्यक्रम पत्रिका वारंवार बदलावी लागली. त्यामुळे रात्री उशिरा कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हा विषय आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याने आपण या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहिलो, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

खासदार, आमदारांना बोलूही दिले नाही

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकासाच्या भूमिपूजनाचा सोहळा होता. त्यामुळे या भागाचे लोकप्रतिनिधी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार अशोकबापू पवार यांना बोलण्याची संधी मिळणे आवश्यक होते. 

परंतु संपूर्ण कार्यक्रमाला राजकीय इव्हेंट स्वरूप दिल्यामुळे या दोघांनाही बोलण्याची संधी दिली नसल्याची चर्चा परिसरात रंगली होती. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगभरात पोहोचवणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना बोलण्याची संधी नाकारल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest