CCTV : तिसरा डोळा निकामी, पिंपरी-चिंचवडमधील सीसीटीव्ही बंद पडण्यामागील कारण झाले उघड

पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षेसाठी कोट्यवधींचा खर्च करून बसवलेल्या शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या बॅटरी चोरीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 19 Oct 2023
  • 01:56 pm
CCTV : तिसरा डोळा निकामी, पिंपरी-चिंचवडमधील सीसीटीव्ही बंद पडण्यामागील कारण झाले उघड

संग्रहित छायाचित्र

वर्षभरात १०० हून अधिक बॅटरी चोरीला

 

रोहित आठवले

पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षेसाठी कोट्यवधींचा खर्च करून बसवलेल्या शेकडो सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांच्या बॅटरी चोरीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. (Pimpri-Chinchwad)

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील झपाट्याने विकसित होत असलेल्या पिंपळे-सौदागर बरोबरीनेच जुनी सांगवी, पिंपळे गुरव, मोशी, प्राधिकरण आणि शहराचे नाक म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चौकातून गेल्या वर्षभरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बॅटरी चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. महत्वाचे म्हणजे, स्मार्ट सिटीने ठेकेदारामार्फत बसवलेल्या सीसीटीव्हीपैकी निम्मे कॅमेरे सध्या सुरू आहेत आणि त्याच्याही बॅटरी चोरीला गेल्याने पोलिसांना तपासात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत अनेक गुन्ह्यांच्या तपासावेळी आरोपी आणि त्यांनी वापरलेली वाहने कुठून कुठे गेली, हे पोलिसांना समजण्यात अडसर येत होता. सीसीटीव्ही बंद, कॅमेऱ्यांची दृश्यमानता कमी, रेकॉर्ड उपलब्ध करण्यासाठी करावा लागणारा कागदोपत्री पुराव्यांचा अभाव अशी कारणे दिली जात होती.

मात्र, आता चौकात लावलेल्या ८ ते १० कॅमेऱ्यांसाठी तेथेच एक बॉक्समध्ये बॅटरी ठेवली जाते. पण चोरट्यांकडून या बॅटरी चोरीचे धाडस केले जात असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दिवसाला शहरातून किमान पाच वाहनांची चोरी होते, तर किमान ८ ते १० जण विविध कारणांनी घर सोडून निघून जातात. त्याचबरोबर अपहरण करून खून, लहान मुलांचे अपहरण, खंडणीसाठी पळवून नेणे, हाणामारी असे अनेक गुन्हे घडत असतात. त्यामुळे या सगळ्या गुन्ह्यांच्या तपासात अत्यंत महत्वाचा दुवा म्हणून सुरुवातीला राज्य शासनाने सीसीटीव्ही बसवले होते. कालांतराने महापालिकेने सीसीटीव्ही बसवले. आता हेच काम कोट्यवधींचा खर्च करून स्मार्ट सिटी अंतर्गत केले जात आहे. परंतु, रस्त्यावर लावलेल्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या बॅटरी नोव्हेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत अनेक ठिकाणांहून चोरीला गेल्या आहेत. एखादी घटना घडल्यावर अथवा ठराविक कामांसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग तपासण्यासाठी आणि मेन्टेनन्ससाठी कर्मचारी गेल्यावर बॅटरी नसल्याने कॅमेरे बंद असल्याचे उघड झाले आहे.

शहरातील सीसीटीव्ही हे करसंकलन विभागाच्या स्थानिक कार्यालयात जोडण्यात आले आहेत. तेथून निगडी येथील कमांड कंट्रोल रूममध्ये हे कॅमेरे जोडण्यात आले आहेत. या कमांड कंट्रोल रूममध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन कर्मचारी २४ तास उपस्थित असतात. वाहतूक पोलीस याच कॅमेऱ्यात पाहून नियमभंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवून कारवाई करीत आहेत. मात्र, कमांड कंट्रोल रूम आणि वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात बसून नागरिकांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बॅटरी चोरीला जात असल्याचे लक्षात का आले नाही, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

सुहास सुरेश केसकर (वय ४९, रा. रावेत) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, एकट्या सांगवी पोलिसांच्या अखत्यारित येणाऱ्या परिसरातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बॅटरी चोरीला गेली, असे नाही. त्यामुळे याबाबत संयुक्तपणे तपास होण्याची आवश्यकता आहे. बॅटरीमध्ये थोडे बदल करून या बॅटरी कार आणि दुचाकींसाठी वापरता येऊ शकतात. त्यामुळे त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बॅटरी चोरणारी ही एकच टोळी असण्याची शक्यता आहे. आम्ही तक्रार देतानाच संबंधित कंपनी आणि ठेकेदार या दोघांना बॅटरी सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना अधिक चांगल्या करण्याच्या सूचना केल्या आहेत. नव्याने बॅटरी बसवेपर्यंत तेथील रेकॉर्डिंग झालेले नाही. आम्ही आवश्यक खबरदारी घेत आहोत.

- किरण यादव, सहसंचालक, स्मार्ट सिटी

बॅटरी टप्याटप्याने चोरीला गेल्याचे संबंधित कंपनीचे म्हणणे आहे. कॅमेरे बंद झाल्यानंतर तत्काळ याची माहिती देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्यांनी आम्हाला सांगणे  गरजेचे होते. आम्ही संपूर्ण गुन्हे शाखेला आणि स्थानिक पोलिसांना याबाबत तपासाच्या सूचना केल्या आहेत. लवकरच आरोपींचा शोध लागेल.

- सतीश माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest