पिंपरी-चिंचवड : आयटी पार्कचा 'मार्ग' खडतर

जगाच्या नकाशावर 'आयटी हब' म्हणून नावलौकिक मिळवलेली हिंजवडी अद्यापही वाहतूक समस्यांतून (Traffic problems) सुटलेली नाही. मेट्रोचे काम आणि रस्त्याच्या अनेक समस्यांमुळे आयटियन्सच्या समस्यात आणखी भर पडली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Tue, 23 Apr 2024
  • 03:47 pm
Pimpri Chinchwad News

पिंपरी-चिंचवड : आयटी पार्कचा 'मार्ग' खडतर

वारंवार मागणी करूनही प्रश्न 'जैसे थे', तीन लाख आयटियन्सचा जीव टांगणीला; आचारसंहितेमुळे कामे रखडल्याचा दावा

जगाच्या नकाशावर 'आयटी हब' म्हणून नावलौकिक मिळवलेली हिंजवडी अद्यापही वाहतूक समस्यांतून (Traffic problems) सुटलेली नाही. मेट्रोचे काम आणि रस्त्याच्या अनेक समस्यांमुळे आयटियन्सच्या समस्यात आणखी भर पडली आहे. मेट्रो आणि एमआयडीसी या दोन स्वतंत्र विभागांचा समन्वय नसल्याने त्याचा फटका येथील आयटियन्स, उद्योजक, शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना बसत आहे. वाकड ते हिंजवडी चौक हा मार्ग ओबडधोबड अन् असमतोल असल्याने दुचाकी घसरून अपघात होत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आयटियन्सच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत आहेत. (Pimpri Chinchwad News)

वाकड ते हिंजवडी या मार्गात अनेक अडथळे असून, मेट्रोचे काम सुरू होण्यापूर्वी वाहतूक नियंत्रणाबाबत आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी आयटियन्सकडून करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने गेल्या पाच वर्षांपासून हा त्रास सहन करावा लागत आहे. तो अजूनही तसाच आहे. मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. त्यातच वाकड उड्डाणपुलापासून सुरू होणारा हा मार्ग पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत खडतर बनला आहे. रस्त्याच्या उजव्या बाजूला पूर्ण सिमेंटचा रस्ता तर, डाव्या बाजूला सिमेंटचे ठोकळे (ब्लॉक)  लावण्यात आले आहेत. या रस्त्यावर अवजड वाहने, बसेस यांची वर्दळ असल्याने डाव्या बाजूचा मार्ग खचत आहे. त्यामुळे रस्त्यावरील ड्रेनेजचे चेंबरदेखील वर आले आहेत. त्याचप्रमाणे हा रस्ता असमतल झाला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.  त्यामुळे वाहने घसरून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यातच बेशिस्त पार्किंग आणि अतिक्रमणामुळे या समस्येत भर पडत आहे.

सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खच पडले आहे. तसेच, काही ठिकाणी सिमेंटचे ब्लॉक उखडून गेल्याने खड्डे पडले आहेत. हा रस्ता मोठा वर्दळीचा आहे. दिवसाला रोज पाच ते सहा लाख आयटियन्स या रस्त्याचा वापर करतात. पूर्वी केवळ कामासाठी हिंजवडीच्या रस्त्याला आयटियन्स येत होते. मात्र आता या परिसरात मोठ-मोठ्या सोसायट्या होत असल्याने लोकसंख्यादेखील वाढली आहे. मात्र अद्याप रस्त्याची सुविधा आणि कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसल्याने समस्या आहे तिथेच आहे. पर्यायी मार्ग आणि सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्याने नाईलाज कामगार वर्गाला दुचाकींचा वापर करावा लागतो.

समस्या सुटेना, कोंडी फुटेना

हिंजवडी या परिसरातील वाहतूक समस्या कायमच इतर कर्मचारी आणि पोलिसांची डोकेदुखी राहिलेली आहे. स्वतंत्र वाहतूक व्यवस्था, एकेरी मार्ग, मार्गात बदल आणि वाहतूक पोलिसांकडून देखील उपाययोजना राबवण्यात आलेल्या आहेत. मात्र, मूळ समस्या या सुटल्या नसून, वाहतूक कोंडीतून अद्याप वाहनचालक सुटू शकले नाहीत.

 .. त्यामुळे दुचाकींचा वापर

हिंजवडी आयटी परिसरात वाढत जाणारी वाहतूक समस्या आणि पार्किंग या दोन कारणांमुळे आयटी कर्मचारी दुचाकी वापरतात. मात्र, रस्त्याची दुरवस्था आणि अतांत्रिक रस्त्यामुळे सुमारे तीन लाख दुचाकी वापरणाऱ्या कामगारांना समस्या भेडसावत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून आयटी प्रोफेशनल्सकडून किमान रस्त्याची अपेक्षा केली जात आहे. मात्र तो प्रश्न अद्याप सुटलेला नाही. आयटी पार्कला इतर पर्यायी कनेक्टिव्हिटी देखील नाही. परिणामी, वाहतूक कोंडीतून आणि जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अनेकदा मागण्या , पाठपुरावा करून देखील त्याची दखल घेतली नाही

-पवनजीत माने, फोरम फॉर आयटी इंडस्ट्री, राज्य समन्वयक

या रस्त्याबाबत पाहणी करण्यात आली आहे. लवकरच दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे ही समस्या लवकरच सुटेल. सद्या सुरू असलेल्या आचारसंहितेमुळे निविदा काढता येत नाही.

-विजयकुमार रुइकर, कार्यकारी अभियंता, हिंजवडी एमआयडीसी

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest