Pimpri Chinchwad: लष्कर हद्दीतील रस्त्याला खो

महापालिका प्रभाग २८ मधील पिंपळे सौदागर येथील लष्कर हद्दीची जागा ताब्यात दिल्यानंतरही त्याची प्रतिपूर्ती करण्यास अधिकारी चालढकल करीत आहेत. यामुळे नॅचरल आईस्क्रीम स्टोअर ते ट्रॉईज सोसायटीपर्यंत १८ मीटर सिमेंट रस्त्याच्या

Pimpri Chinchwad: लष्कर हद्दीतील रस्त्याला खो

जागा हस्तांतरित होऊनही पिंपळे सौदागरमधील रस्ता रखडलेलाच, १८ मीटर सिमेंट रस्त्यासाठी पालिकेने काढली १४ कोटी ८२ लाखांची निविदा

विकास शिंदे:
महापालिका प्रभाग २८ मधील पिंपळे सौदागर येथील लष्कर हद्दीची जागा ताब्यात दिल्यानंतरही त्याची प्रतिपूर्ती करण्यास अधिकारी चालढकल करीत आहेत. यामुळे नॅचरल  आईस्क्रीम स्टोअर ते ट्रॉईज सोसायटीपर्यंत १८ मीटर सिमेंट रस्त्याच्या कामाला निविदा काढूनही खो बसला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे वारंवार पाठपुरावा करून लष्कर हद्दीची जागा ताब्यात घेण्यास योगदान देणाऱ्या नागरिकांनी महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

कासारवाडी ते कोकणे चौक मार्गे शिवार चौक व पुढे जगताप डेअरी मार्गे पुणे, हिंजवडी आणि रावेत भागात जाणारा हा मार्ग पिंपळे सौदागर येथील मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर वाहनांची नेहमीच रहदारी होत असल्याने पीके चौक, कोकणे चौक आणि शिवार चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. 

ही कोंडी फोडण्यासाठी नॅचरल आईस्क्रीम स्टोअर ते ट्रॉईज सोसायटी हा ९२० मीटर लांबीचा १८ मीटर रुंद रस्ता विकसित करण्यासाठी जागेचा ताबा देण्यास लष्कराकडून प्रतिसाद मिळत नव्हता. स्थानिक नागरिकांनी लष्कराची जागा ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय संरक्षण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. दिल्लीपर्यंत पाठपुरावा करून रितसर पत्रव्यवहार केल्यानंतर जागा हस्तांतरण करण्यास संरक्षण विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, लष्कर हद्दीतील जागेच्या आर्थिक मूल्याधारित रकमेची महापालिकेने प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय लष्कर अधिकारी आणि महापालिका अधिकारी यांच्यात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला होता. परंतु, त्यानंतर जागेच्या मूल्याधारित रकमेची कामे महापालिकेने करून द्यावीत, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार महापालिकेने सुमारे ३० कोटींची लष्कर हद्दीतील कामे करून द्यावयाची आहेत. परंतु, त्यासाठी महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचे सकारात्मक पाऊल उचलले जात नसल्यामुळे रस्त्याचे विकास काम लष्कर विभागाने थांबवले आहे.

निविदा कोणाच्या भल्यासाठी ?

नॅचरल  आईस्क्रीम स्टोअर ते ट्रॉईज सोसायटीपर्यंत ९० मीटर लांब व १८ मीटर रुंद सिमेंट रस्ता केला जाणार आहे. या कामासाठी महापालिकेने १४ कोटी ८२ लाख ८८ हजार रुपये खर्चाची निविदा ऑक्टोबर २०२३ मध्ये काढली. आता लष्कर विभागाकडून हे काम करू दिले जात नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. याचा अंदाज होता तर मग कोणाच्या भल्यासाठी निविदा काढली, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

बीआरटी रस्ता ते ट्रॉईज सोसायटी १८ मीटर सिमेंट रस्त्याची जागा हस्तांतरण प्रक्रिया चार महिन्यांपूर्वी पार पडली. महापालिका अधिकारी आणि संरक्षण विभागाचे अधिकारी यांच्यात सामंजस्याने निर्णय झाला. संरक्षण खात्याकडून रस्त्याचे काम सुरू करण्यास हिरवा कंदील दिला गेला. तरी, पालिका स्तरावर पाऊले उलचली जात नसतील तर आता दाद मागायची कोणाकडे हा प्रश्‍न आहे.  – संदीप काटे, स्थानिक नागरिक

लष्कर हद्दीतील जागेची प्रतिपूर्ती करण्यास काही तांत्रिक कारणांमुळे विलंब होत आहे. यामुळे काम सुरू करण्यास अडचणी येत आहेत. नगररचना विभागाशी समन्वय साधून हा प्रश्‍न चर्चेअंती मार्गी लावला जाईल. लष्कराची जागा घेण्याच्या बदल्यात तेथील विविध कामे करून द्यावी लागणार आहेत. अजून रस्त्याची काही जागा ताब्यात नाही. लष्कर आणि महापालिकेचा करार करून हे काम पूर्ण करावे लागणार आहे.   – देवान्ना गट्टूवार, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, महापालिका

लष्कर विभागाकडून अठरा मीटर रस्त्याची जागा ताब्यात आलेली आहे. जागेच्या बदल्यात सुमारे ३० कोटींची कामे करून द्यावी लागणार आहेत. त्या संदर्भात १५ मार्च रोजी संरक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासोबत नियोजित बैठक आहे. यावेळी हा प्रश्‍न मार्गी लागेल. -अशोक कुटे, उपअभियंता, नगर रचना विभाग

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest