आयुक्तालयाच्या इमारतीवर बसवली जाळी
आंदोलक आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शासकीय इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करतात. शासकीय इमारतीवरून आंदोलकांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी उड्या मारण्याच्या घटना यापूर्वी राज्यात घडल्या आहेत. त्यामुळे शासकीय इमारतींवर जाळी बसविण्याच्या सूचना राज्य सरकारने सर्व विभागांना दिल्या होत्या. परंतु, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात (Pimpri Chinchwad Police Commissionerate) जाळी बसविण्यात आली नव्हती.
मात्र, मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाचे ठिकठिकाणी तीव्र पडसाद उमटले आहेत. या आंदोलनाचा शासनाने चांगलाच धसका घेतला आहे.
मराठा समाजातील अनेक जणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. पुढील काळात मराठा आंदोलन आणि अन्य आंदोलने तीव्र होऊन त्याचे पडसाद उमटू नये यासाठी शासन प्रत्येक पातळीवर खबरदारी घेत आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात दररोज शेकडो नागरिकांची ये-जा सुरु असते. तक्रारदार आपली कैफियत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडण्यासाठी तासंतास आयुक्तालयात बसून असतात.
त्यातच एखाद्याने टोकाचे पाऊल उचलून उडी मारण्याची घटना घडू नये यासाठी पोलिसांनी देखील खबरदारी घेतली आहे. अशा प्रकारांमधून होणारी हानी टाळण्यासाठी आयुक्तालयाच्या इमारतीवर जाळी बसवण्यात आली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.