पवना नदीचे पात्र चारवेळा पिंपरी-चिंचवड शहरात फेसाळले
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीचे (Pawana River) पात्र मागील काही दिवसात चारवेळा पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात फेसाळले. नदीपात्रात थेट ड्रेनेज, रसायनमिश्रित पाणी (Chemically mixed water) सोडले जाते. रावेत येथील अशुद्ध बंधाऱ्यापर्यंत दुषित पाणी गेले आहे. शहरवासीयांना दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. पवनामाईच्या दुर्देशला महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी हे जबाबदार आहेत. शासनाने त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा सत्ताधारी शिवसेना पक्षाचे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे (Srirangam Barne) यांनी दिला आहे.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना पत्र लिहून संजय कुलकर्णी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची (एमपीसीबी) पत्र दिले आहे.
खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, शहरातून वाहणाऱ्या पवना नदीचे पात्र २४ किलो मीटर आहे. किवळेपासून दापोडीपर्यंत पवना नदीचे प्रदूषण वाढले आहे. नदीलगतच्या भागात किवळे, पुनावळे, रावेत, ताथवडे, वाल्हेकरवाडी, थेरगाव, चिंचवडगाव, काळेवाडी, पिंपरी, दापोडी, पिंपळेगुरव, सांगवी, कासारवाडी व दापोडीपर्यंत पाण्याचे प्रदूषण वाढल्याचे दिसून येते. पवना नदी सातत्याने फेसाळत आहे.
नदीतील पाण्यावर फेस तरंगतो. नदी प्रदूषित झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात चारवेळा नदी फेसाळली. दोनदिवसांपूर्वी थेरगावातील केजुदेवी बंधारा ते चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी घाट या दरम्यान पवना नदी मोठ्या प्रमाणात फेसाळली. मासे मृत पावले. सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्याने सातत्याने नदी फेसाळत आहे. पवनामाईची दुरावस्था झाली आहे.
नदीपत्रातील पाणी अशुद्ध झाले आहे. दुर्गंधी मोठ्या प्रमाणे होत असल्यामुळे नैसर्गिक जीवितहानी होत आहे. बंधाऱ्यातील पाणी दुषीत झाल्याने मासे व इतर जलचर प्राणी मृत पावले आहेत. नदीपात्रातील पाणी अशुद्ध होत असल्याकारणाने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
पवना नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. नदी सुधारसाठी मी अनेक दिवसांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. अनेक पर्यावरणप्रेमी संघटना त्याविरोधात आवाज उठवत आहेत. परंतु, प्रशासन नदीचा प्रश्न गांभीर्याने घेत नाही. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे घाण पाणी रावेत बंधाऱ्याच्या वर गेले आहे. ज्या पाण्यामध्ये जीव राहत नाहीत, ते पाणी धोक्याचे आहे, असेही खासदार बारणे म्हणाले.
संजय कुलकर्णी आणि एसटीपी मालकांचे आर्थिक लागेबांध असल्याचा थेट आरोप
पवना नदीच्या दुर्देशला पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी हे पूर्णपणे जबाबदार आहेत. सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) मालक आणि कुलकर्णी यांचे आर्थिक लागेबांधे आहेत. त्यामुळे शासनाने तत्काळ कुलकर्णी यांच्यावर कारवाई करावी. यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. शासनाने कारवाई न केल्यास पवना नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या कुलकर्णी यांच्याविरोधात याचिका दाखल करणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.
संजय कुलकर्णी हे स्वत:ची जहागिरी, मनमानी पद्धतीने काम करत आहेत. ते निष्क्रिय अधिकारी असून पवना नदीच्या प्रदूषणाला कुलकर्णी जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे खासदार बारणे यांनी यावेळी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.