पिंपरी-चिंचवड : उद्योगनगरीत महापालिकेच्या कामाची गती मंदावली
पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून तब्बल ४,६४८ रिक्त पदे आहेत. वारंवार मागणी करूनही ही पदे अद्याप भरलेली नाहीत. या जागा अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने त्याचा महापालिकेच्या दैनंदिन कामावर विपरित परिणाम होत आहे.
शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून सध्यस्थितीत ३० लाखांच्या घरात गेली आहे. या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविताना महापालिकेची दमछाक होत आहे. उपलब्ध मनुष्यबळ कमी असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढत आहे. महापालिकेच्या नवीन आकृतीबंधानुसार एकूण ११ हजार ५१५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ ६ हजार ८६७ पदांवर अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत.
दर महिन्यास किमान २० ते २५ अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्या जागेवर नोकरी भरती होत नसल्याने अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत. आतापर्यंत तब्बल ४ हजार ६४८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे एकाच अधिकाऱ्यांकडे अनेक विभागांची जबाबदारी टाकली जात आहे. परिणामी, नियमित दैनंदिन कामकाज आणि त्यात अतिरिक्त जबाबदारी, यामुळे महापालिकेच्या कामकाजाचा खोळंबा होत आहे. या सर्व विलंबामुळे करदात्या नागरिकांना वेळेत नागरी सुविधा उपलब्ध होत नाहीत. कामाचा दर्जा ढासळत आहे. विकासकामे रखडण्याचे प्रकार वाढले आहेत.
महापालिकेच्या सुरुवातीपासून कार्यरत असलेले अनेक अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत, तसेच, काही अधिकारी निवृत्तीच्या टप्प्यात आहेत. २००० पासून महापालिकेतून वर्ग एक ते वर्ग चारमधील तब्बल ६ हजार १६३ अधिकारी सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त, राजीनामा, निधन यामुळे शासनसेवेतून गेले आहेत.
नगरसचिव, उपनगरसचिवपद पाच महिन्यांपासून रिक्त महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप हे ३० जून २०२४ ला सेवानिवृत्त झाले. त्यापूर्वी किमान तीन महिने अगोदर नगरसचिव पद भरणे आवश्यक होते. नव्या नगरसचिवाला ते कामकाज समजून घेता आले असते. मात्र, तसे न झाल्याने महापालिकेत सध्या नगरसचिव तसेच, उपनगरसचिव नाहीत. अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे नगरसचिव पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. वरिष्ठ पदावरील अधिकारी सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्या जागी पात्र अधिकाऱ्यांची किमान एक ते दोन महिने अगोदर नियुक्ती होणे आवश्यक आहे. त्या अधिकाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. त्या पदावर अधिकारी उपलब्ध नसल्यासे जाहिरात देऊन त्या जागा तातडीने भरणे गरजेचे आहे. मात्र, त्याबाबत तातडीने हालचाल होत नसल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेकडून ३६० पदांची नोकरभरती काही महिन्यापूर्वीच पूर्ण झाली. लिपिक आणि अभियंता पदावर रूजू झालेल्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अग्रिशमन विभागाची विविध पदे भरली जात आहेत.
- विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग