रात्रीस खेळ चाले...; नशेच्या बाजारात हुक्क्याचा धूर
बेकायदेशीर हुक्क्याचा धुराने नशेचा बाजार भरभराटीस आला असताना पोलीस मात्र त्यावर कोणतीही (Pimpri-Chinchwad) कारवाई करत नसल्याचे ‘सीविक मिरर’ (Civic Mirror) ने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’ (Sting Operation) मध्ये उघडकीस आले आहे. ‘स्टिंग ऑपरेशन’ मध्ये पिंपरी-चिंचवड परिसरातील मॅजेस्टिक रेस्टो अॅण्ड बारमध्ये (Majestic Resto and Bar) दरवाजे नावापुरते बंद केले होते, आतमध्ये मात्र (Pimpri Chinchwad) हुक्क्यापासून मद्यापर्यंत सर्व काही सेवा पहाटेपर्यंत बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे आढळले. धक्कादायक बाब म्हणजे आपल्याकडे हुक्का चालविण्याचा परवाना आहे. वाकड पोलीस येऊन नेहमी दंड करतात आणि दंड भरून पहाटेपर्यंत आम्ही हॉटल चालवितो, असे मॅजेस्टिक रेस्टो अॅण्ड बारच्या मालकांनी ‘सीविक मिरर’ शी बोलताना सांगितले.
जगताप डेअरी परिसरातील कस्पटे वस्ती चौकातून जगताप डेअरीकडे येताना डाव्या बाजूला महापालिकेच्या उद्यानाजवळ हे हॉटेल आहे. रस्त्यापासून थोडेसे आतमध्ये असल्याने ते थेट दिसत नाही. मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलशी संबंधित दोन-तीन जण रस्त्याजवळ उभे राहून लक्ष ठेवतात. नेहमीचा किंवा काही गडबड करणार नाही असा कस्टमर असेल तर त्याला आतमध्ये नेऊन बसवितात. रात्री साडेअकरानंतर हॉटेलच्या बाहेरील लाईट बंद करून हॉटेल बंद झाल्याचा आभास निर्माण केला जातो. कस्टमरला हे माहीत असते. पोलीस हेच कारण पुढे करून कारवाई करण्याकडे कानाडोळा करतात, असेही सांगितले जाते. अनेकदा तर पोलिसांची गस्तीची गाडी येथून जाते. परंतु, त्यांना आतमध्ये हॉटेल सुरू असल्याचा पत्ता लागत नाही !
सुमारे शंभर ते दीडशे क्षमता असलेल्या हॉटेलमध्ये रात्री बारानंतरही गर्दी असते. हॉटेलमध्ये कस्टमर येण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. ऑर्डर घेतल्या जात आहेत. रात्री अडीच वाजता हुक्क्याच्या धुराने वातावरण धुंद झाले आहे. मद्य सर्व्ह केले जात आहे. रात्रीचे अडीच वाजले तरी कस्टमर अजूनही येत आहेत. अनेक टेबलांवर हुक्का सर्व्ह केला जात आहे. पाहिजे त्या फ्लेवरचा हुक्का दिला जात आहे. वास्तविक पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पूर्णपणे हुक्काबंदी आहे. मात्र, तरीही हॉटेलमध्ये बहुतांश टेबलांवर हुक्का पॉट ठेवल्याचे दिसले.
आमच्याकडे मद्य आणि हुक्का पार्लर चालविण्याचा परवाना आहे. आम्ही पहाटेपर्यंत बार आणि हुक्का चालवितोच, नाही कोठे म्हणतो. त्याच्यासाठी वाकड पोलीस आम्हाला दंडही करतात. दंड भरून आम्ही बार चालवितो.
- संदीप थोरवे, मॅजेस्टिक रेस्टो अॅण्ड बार, मालक
कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर गोष्टी झाल्यास पोलीस नेहमीच अलर्ट मोडवर असतात. पोलीस उपायुक्तांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले जाईल.पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदेशीर कृत्य आढळले तर हॉटेल आणि रेस्टॉरन्टवर कारवाई केली जाईल. पोलीस विभागातील कोणी या बेकायदेशीर कृत्यामध्ये सहभागी असल्याचे आढळले तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
- विनय चोबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड
पोलिसांची कारवाई?
वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावंदवाड यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, हुक्का बंदी आहे. मॅजेस्टिक बार अँड लाऊंजमध्ये हुक्का दिला जातो का, याबाबत माहिती नाही. ही माहिती घेतली जाईल. मात्र, सकाळी सहापर्यंत हॉटेल चालू ठेवले जाते, असे मालकच म्हणत आहे. वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस येऊन दंड करून जातात असेही त्यांनी सांगितले. जर पोलिसांनी या ठिकाणी दंडाची कारवाई केली तर हुक्का सापडलाच असेल ना? असे जावंदवाड यांना विचारले असता त्यांनी फोन कट केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.