आळंदी बंदची हाक अखेर मागे, अलंकापुरी वारकऱ्यांनी पुन्हा गजबजली
देवस्थानच्या विश्वस्त पदावरून स्थानिकांना डावलल्यामुळे आळंदी बंदची हाक देण्यात आली होती. आज (मंगळवारी) आळंदी बंद पुकारण्यात आला होता. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर बंदचा सावट दिसून येत होते. मात्र, गावकऱ्यांनी आळंदी बंदचा निर्णय मागे घेतल्यानंतर बाजारपेठ पुन्हा गजबजली आहे. वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी गावकऱ्यांनी बंदचा निर्णय मागे घेतला.
आळंदीकरांनी ऐन संजीवन समाधी सोहळ्यातच बंदचे हत्यार उपसले होते. आळंदी बंदच्याच पार्श्वभूमीवर सकाळी दहा वाजता चाकण चौक येथून संत ज्ञानेश्वर महाराज महाद्वार चौकपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. पण तोवर लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल झाले होते. या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून देवस्थानच्या विश्वस्तांनी ग्रामस्थांना चर्चेसाठी बोलावले. चर्चेसाठी बोलवणारे विश्वस्त हे वशिला लावून आले. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार नसल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले.
स्थानिक ग्रामस्थांशी समेट घालून तोडगा काढण्याचे विश्वस्तांचे प्रयत्न निष्फळ ठरले. दुसरीकडे मोठी गैरसोय होत वारकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला. ज्या वारकऱ्यांमुळं आळंदीला महत्व प्राप्त झालंय. आता त्यांना फार काळ वेठीस धरणं, सोयीचं नसेल. ही बाब लक्षात आल्यावर दुपारनंतर बंद स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा अलंकापुरी वारकऱ्यांनी गजबजली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.