संग्रहित छायाचित्र
भोसरी विधानसभा मतदार संघा अंतर्गत एकूण ४९२ केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. मात्र, मतदान केंद्र परिसरामध्ये मोबाईल, वाहन पार्किंग या कारणामुळे मतदारांचे पोलिसांसोबत वाद निर्माण झाले. तर, भोसरी गावठाण येथील एका शाळेतील केंद्रामध्ये प्रचार करीत असल्याचा आरोपामुळे काही काळ तणाव झाला होता. पोलिस आणि निवडणूक कर्मचारी यंत्रणांमुळे हा तणाव दूर करण्यात आला. दरम्यान, सकाळी नऊ वाजेपर्यंत संथ सुरु असलेली मतदान टक्केवारी अकरा वाजेनंतर मोठ्या प्रमाणात वाढली. पाच वाजेपर्यंत शहरात सर्वाधिक ५९.६१ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाच्या टक्का घटला आहे.
शहरातील तीन विधानसभापैकी या ठिकाणी होत असलेली निवडणुक चुरशीची मानली जात आहे. थेटपणे दुरंगी लढत होत असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघात दुपारनंतर प्रतिसाद वाढू लागला. समाविष्ट चऱ्होली, दिघी भागात रांगा लावून मतदार मतदान करण्यात आले. भोसरीत सकाळी मतदानामध्ये निरुत्साह होता. सकाळी सात ते नऊ या दोन तासांमध्ये अवघे ६.२१ टक्के मतदान झाले होते. मात्र त्यानंतर नागरिक हळूहळू बाहेर पडू लागले. चार तासात १६.८३ टक्के मतदान झाले आहे. त्यानंतर दुपारी १ वाजेपर्यंत ३०.४१ टक्के मतदान झाले. त्यानंतर मात्र दुपारमुळे पुन्हा मतदार केंद्रामधील गर्दी कमी होऊ लागली. दुपारी तीन वाजेपर्यंत केवळ १३ टक्के वाढ होऊन एकूण मतदान ४३. १६ टक्केपर्यंत गेले. शहरी आणि ग्रामीण असा संमिश्र स्वरूपाचा हा मतदारसंघ आहे. तर, सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा टक्का ५० टक्के ओलांडून सर्वाधिक मतदान ५५.०८ टक्क्यांची नोंद झाली.
हरित केंद्रावरती कचराच कचरा
इंद्राणी नगर येथील श्री स्वामी समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल हे केंद्र हरित म्हणून निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. मात्र, या केंद्राच्या आत मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा पडल्याचे दिसून आले. प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, खाण्याचे उष्टे पॅकेट आणि प्लास्टिकच्या पिशव्या पडल्या होत्या. त्यामुळे हरित केंद्र नुसते नावालाच असल्याचे दिसून आले
सेल्फी पॉईंट हटवले
भोसरी ते विविध केंद्रावरती मतदारांना फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉईंट ठेवले होते. मात्र, त्या ठिकाणी होणारी गर्दी, त्यासाठी होणारा मोबाईलचा वापर यामुळे पोलिसांनी केंद्रावरती सेल्फी पॉइंट हटवले. मात्र ते केंद्रापासून लांब ठेवल्याने त्या ठिकाणी कोणी फोटो काढण्यासाठी गेले नाही. तर, काही सेल्फी पॉईंट काढून बाजूला ठेवण्यात आले होते.
७१ टक्के व्होटरस्लिप वाटून गोंधळ
भोसरी विधानसभा अंतर्गत ४ लाख ३७ हजार म्हणजेच ७१ टक्के व्होटर स्लिप वाटप झाले. मात्र प्रत्यक्षामध्ये अनेक मतदारांना त्यांची नावे शोधण्याची वेळ आली होती. महिला मतदारांमध्ये सर्वाधिक हे प्रमाण होते. इंद्रायणी नगर मध्ये एका केंद्रावरती दोन महिलांना त्यांची नावे सापडली नाहीत. मतदार सहाय्यता कक्षाकडून त्यांना परत पाठवण्यात आले.
तब्बल साडेसात हजार मतदारांची नावे गायब
दरम्यान, भोसरी मतदारसंघांमध्ये मतदार यादीतील घोळ समोर आला असून, साडेसात हजार मतदारांची नावे गायब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा आकडा मोठ्या प्रमाणात असून, ही नावे कशी गायब झाली याबाबत संशय निर्माण झाला आहे. त्याबाबत भोसरी विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी रेवननाथ लबडे यांनी सांगितले की त्याबाबत कोणतीही तथ्यता नाही. त्या संबंधित तक्रार आल्यानंतर त्याची शहानिशा केली जाईल.
सन २०१४ मध्ये महेश लांडगे अपक्ष म्हणून विजयी झाले. पुन्हा ते २०१९ मध्ये भाजपाच्या चिन्हावर निवडून आले. आता तिसऱ्यावेळी लांडगे नशीब आजमावत असून, हॅट्रिकची संधी शोधत आहेत. मात्र यंदा त्यांना काटे की टक्कर म्हणून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या अजित गव्हाणे यांनी तगडे आव्हान दिले आहे. त्यामुळे भोसरीत चुरस निर्माण झाली आहे. विशेषतः भोसरी गावठान, इंद्रायणी नगर, एमआयडीसी, गुळवे वस्ती, बोराडे वाडी, मोशी, चिखली या परिसरामध्ये नागरिक अकरानंतर मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. त्यानंतर मतदानाचा टक्कादेखील वाढत गेला.
सतरा मतदान केंद्र बदलले, मतदारांमध्ये गोंधळ
भोसरी मतदारसंघातील चिखली, मोशी, बोराडे वाडी, वडमुख वाडी या परिसरातील १७ केंद्रामध्ये बदल केले होते. यापैकी महापालिकेच्या शाळेमध्ये पूर्वी केंद्र होती. मात्र, ती बदलून केंद्रीय विहार सोसायटी, चिखली घरकुल आणि प्रादेशिक कृषी विस्तार केंद्र या ठिकाणी नेण्यात आली. त्यामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. निवडणूक प्रशासनाचा हा बदल नागरिकापर्यंत पोचला नसल्याचा आरोप मतदारांनी केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.