टँकरचा स्फोट गॅस चोरीतूनच; संगनमताने गॅसचोरीचा गोरखधंदा, टँकरचालक फरार, पाच जणांवर गुन्हा
सोमनाथ साळुंके
शेल पिंपळगाव येथील मोहितेवाडी परिसरातील झालेला टँकरचा स्फोट हा गॅस चोरीतून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी चार आरोपींना चाकण पोलिसांनी अटक केली असून या घटनेतील टँकर चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
चैतन्य गणपत मोहिते (वय ५०वर्षे, रा.मोहीतेवाडी ता.खेड,जी.पुणे), सुरेश रूपानी (रा.राजस्थान), सुदर्शन कान्होरकर (रा.दावडी,खेड, जि.पुणे) व सोमनाथ पोतले (रा.मोहीतेवाडी) यांना पोलिसांनी अटक केली असून टँकरचालक मुश्ताक कमलुद्दीन हा आरोपी फरार आहे. चाकण पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जागामालक कैलास मोहिते यांनी इतर आरोपींना मोकळी जागा भाड्याने दिली होती. तेव्हा आरोपींनी मोकळी जागा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी ढाबा सुरू केला होता. मात्र रविवारी (१९ मे) गॅसने भरलेला टँकर क्रमांक (जीजे-०६ एएकस/५४१८) पहाटेच्या सुमारास चाकण-शिक्रापूर मार्गावरून नगरच्या दिशेने जात असताना शेल पिंपळगावजवळील मोहितेवाडी परिसरातील गुरुकृपा राजस्थानी ढाब्यावर थांबला. त्यावेळी इतर दोन कंटेनर क्रमांक (आरजे-१४/६५८४) व (एमएच-१४ एलबी/९१०९) हे कंटेनरचालकही पहाटेची वेळ असल्याने ते येथे काही कामानिमित्त थांबलेले होते.
पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास गॅस टँकरचालक मुश्ताक व हॉटेल व्यावसायिक आरोपी सुरेश रूपांनी, सुदर्शन कान्होरकर व सोमनाथ पोतले हे टँकरमधून गॅस चोरी करून ते सिलेंडरमध्ये भारत होते. हा गॅस ते काळ्या बाजारात विकत. मात्र रविवारी पहाटेच्या सुमारास टँकरमधून गॅसची चोरी करत असताना गळतीमुळे प्रथम टँकरला आग लागली होती. मात्र आगीचे रुपांतर नंतर स्फोटात झाले आणि त्यात केवळ टँकरचा सांगाडाच उरला होता. तर इतर दोन कंटेनरचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून येथील चार ते पाच घरांच्या भिंतींना देखील तडे गेले आहेत.
या स्फोटात जवळपास कोटीच्या पुढे नुकसान झाले आहे.हा स्फोट इतका जबरदस्त होता की, स्फोटात संपूर्ण मोहितेवाडी परिसर हादरला होता. स्फोटाच्या घटनेमुळे मोहितेवाडी परिसरातील नागरिकांच्या मनामध्ये अजूनही भीतीचे वातावरण असल्याचे समजते. घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अभिजित चौगुले हे करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.