हास्यास्पद कारणे देऊन ध्वजारोहणास नकार देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा - अभाविप
भारतीय स्वातंत्र्यदिन हा सर्व देशवासीयांसाठी गौरवाचा आणि अतिशय आत्मियतेचा विषय आहे. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण होत असताना, भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांनी या वर्षी देखील तीन दिवसीय “हर घर तिरंगा” अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करण्याचे आवाहन संपूर्ण देशवासीयांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व शासकीय तसेच खाजगी कार्यालयांमध्ये ही स्वातंत्र्य दिनानिमित्त मोठा उत्साह दिसला. एकीकडे सर्व देश हा स्वातंत्र्य दिन साजरा करत होता, तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील वाकड परिसरात असलेल्या आदिवासी विद्यार्थी शासकीय वस्तीगृहाच्या गृहपालांनी मात्र वस्तीगृहात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्याची तसदी देखील घेतली नाही. स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पुणे शहराच्या परिसरातील शासकीय वस्तीगृहात ध्वजारोहण न होणे हे खूप दुर्दैवी आहे.
आपल्या वस्तीगृहात ध्वजारोहण का होत नाहीये, या विषयात वस्तीगृहातील विद्यार्थी चौकशी करायला गेले असता, “आपल्या कडे खांब नाही,दोरी नाही, ध्वज लावण्याची आवश्यकता नाही, अशी हास्यास्पद व उडवाउडवीची कारणे विद्यार्थ्यांना देण्यात आली.” इतकेच काय तर या संपूर्ण दिवसभरात वस्तीगृहाचे गृहपाल असणारे घोरपडे सर वस्तीगृह परिसरात फिरकले सुद्धा नाहीत.
या विषयाची माहिती जेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मिळाली, तेव्हा अभाविप कार्यकर्ते या वस्तीगृहाच्या गृहपालांशी बोलायला आले मात्र गृहपालांनी विद्यार्थी कार्यकर्त्यांना बोलणे देखील मह्त्वाचे नाही समजले. ही अतिशय लज्जास्पद बाब आहे असे वक्तव्य महानगर मंत्री सिद्धेश लाड यांनी यावेळी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचे प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यावेळी म्हणाले की, “संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साह दिसून येत होता. ध्वजारोहण, तिरंगा पदयात्रा, रॅली, आयोजित केल्या होत्या. मात्र, वाकड येथील आदीवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय वस्तीगृहात मात्र ध्वजारोहण करण्यात आले नाही. उडवाउडवीची कारणे देऊन आपली जबाबदारी जर कोणी अधिकारी झटकत असेल तर त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी अभाविप सडेतोड उत्तर देईल. या वस्तीगृहाचे संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर प्रशासनाने ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी अभाविप करते.” यावेळी, अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री आनंद भूसणार,पुणे ग्रामीण विभाग संयोजक अनिकेत शेळके, पिंपरी चिंचवड महानगर मंत्री सिद्धेश लाड, सहमंत्री श्रेया चंदन व इतर विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.