आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दल अधिकाऱ्यांवर कारवाई करा: संभाजी ब्रिगेडची मागणी
गल्लोगल्ली कमळ चिन्ह असल्याने निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आचारसंहितेचे उल्लंघन होत असतानाही संबंधितांवर कारवाई करण्यात चिंचवड विधानसभेचे सहायक निवडणूक अधिकारी कसूर करत आहेत. भाजपा पदाधिकाऱ्यांच्या चुकांना खतपाणी घालणाऱ्या दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केली. तसेच कमळ चिन्ह लावणाऱ्या भाजपाच्या (BJP) पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करावे, अशी मागणी काळे यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
काळे यांनी तक्रारी अर्जात म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे पालन करणे सर्वांना अनिवार्य आहे. मात्र त्याचे भान भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नाही. शहरात भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पक्षाचे चिन्ह आणि नावाचा खुलेआम वापर करताना दिसत आहेत. वास्तविक पाहता चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिका-यांकडून पक्षांचे चिन्ह, लोगो हटविण्याची कार्यवाही पार पाडणे आवश्यक आहे. मात्र निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत की काय? असा प्रश्न शहरातील सामान्य मतदारांना पडत आहे. भाजपाचे चिन्ह असलेले कमळ शहराच्या गल्लोगल्ली उघडपणे दिसत आहे. सार्वजनिक भिंती, पोस्टरवर हे चिन्ह दिसत आहे. त्यांच्यावर अद्याप कारवाई होताना दिसत नाही.
याबाबत कमळ चिन्हाचे फोटोसह निवेदन देऊन संभाजी ब्रिगेडने इशारा देण्यात आला होता. त्यानंतर काही काळ कारवाईचा देखावा करण्यात आला. मात्र शहरातील संपूर्ण भाजपचे चिन्ह हटविण्याकडे अधिकारी कानाडोळा करत आहेत. पुन्हा शहरात भाजपाने राजरोसपणे आपल्या चिन्हाचा वापर सुरू केला आहे. निवडणूक आयोगदेखील याची गांभीर्याने दखल घेत नाहीत. आचारसंहितेच्या नियमांना फाट्यावर मारणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच या प्रकरणाकडे गंभीरपणे न बघणाऱ्या चिंचवड विधानसभेतील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरदेखील कारवाई करावी, अशी मागणी काळे यांनी केली.
भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवा
निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करणे बंधनकारक आहे.चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून सर्रासपणे पक्षाचे चिन्ह आणि प्रचार घोषणा गल्लोगल्ली भिंतीवर काढलेल्या आहेत. आता आचारसंहिता लागू होऊनदेखील निवडणूक विभाग आणि पक्षाकडून आचारसंहितेचे पालन केले जात नाही. त्यामुळे ज्या भागात भाजपाचे कमळ चिन्ह उघडपणे लावलेले आहे, त्या विधानसभेचे आमदार, विधानसभा अध्यक्ष, अन्य पदाधिका-यांवर जबाबदारी निश्चित करावी. आचारसंहिता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही काळे यांनी केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.