सर्व पुतळ्यांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, तर मोशीतील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या काही भागांना तडे गेले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून शहरातील सर्व महापुरुषाच्या पुतळ्यांचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्यात येणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 5 Sep 2024
  • 11:42 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा प्रकरणानंतर महापालिकेला आली जाग, शहर अभियंत्यांचे सर्व स्थापत्य अधिकाऱ्यांना पत्र

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, तर मोशीतील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या काही भागांना तडे गेले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून शहरातील सर्व महापुरुषाच्या पुतळ्यांचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील सर्व पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात विविध महापुरूषांचे ३९ पुतळे असून या सर्व पुतळ्यांचे १५ दिवसांत ऑडिट  करण्यात येणार आहे. ऑडिटमध्ये काही बाबी निदर्शनास आल्यास तत्काळ पुतळ्याची दुरूस्ती करण्यात येणार आहे.

थोर महापुरूषांच्या कार्याची नवीन पिढीला माहिती व्हावी, महापुरूषांनी देशाच्या स्वातंत्र्यांसाठी दिलेल्या त्यागाची, बलिदानाची आणि त्यांचा प्रेरणादायी जाज्वल्य इतिहासाची आठवण अवितरतपणे समाजामध्ये, तरुणांना सदैव रहावी, भावी पिढीने महापुरूषांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या विचारसरणीने आयुष्यात वागावे. त्यांचे विचार आत्मसात करावे.

या उद्देशाने शहराच्या प्रवेशद्वारावर, महत्वाच्या चौकात, शासकीय इमारतींमध्ये किंवा इमारतीसमोर महापुरूषांचे पुतळे उभारले आहेत. शहरात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर चाफेकर बंधू यांच्यासह आदी महापुरूषांचे तब्बल ३९ पुतळे उभारण्यात आले आहेत. मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यामुळे राज्यातील सर्व शहरातील पुतळ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात महापालिकेचे आठ क्षेत्रीय कार्यालय आहेत. या सर्व कार्यालयाअंतर्गत तब्बल ३९ पुतळे उभारण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक पुतळे हे ह प्रभाग कार्यालय क्षेत्रात १५, त्यानंतर अ प्रभाग कार्यालय क्षेत्रात ११, ग कार्यालय क्षेत्रात ५ आणि इतर पाच प्रभागात ८ असे ३९ पुतळे आहेत. हे पुतळे उभारण्यासाठी महापालिकेने आत्तापर्यंत कोट्यवधी रूपयांचा खर्च केला आहे.

आठवण केवळ जयंती, पुण्यतिथीला

महापालिका कार्यक्षेत्रात जनसंपर्क विभागाकडून महापुरुषाची आठवण केवळ जयंती, पुण्यतिथीला येते. शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय परिसरात ३९ पुतळे आहेत. यामधील काही पुतळे हे आडबाजूला आहेत. तर काही पुतळे दर्शनी भागात आहेत. या पुतळ्यांकडे महापालिका किंवा सामाजिक संस्था या फक्त जयंती आणि पुण्यतिथीला लक्ष देतात. बाकी वर्षभर पुतळ्यांकडे कोणीही लक्ष देत नाही. मात्र, महापालिका जनसंपर्क विभागाकडून शासकीय नियमांचे उल्लंघन सुरु आहे. शासनाचे आदेश डावलून प्रबोधन पर्व नावाखाली महापालिकेकडून जयंतीवर लाखो रुपये खर्च केले जात आहेत.

मालवण घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व पुतळ्यांचे १५ दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. ऑडिटमध्ये काही बाबी निदर्शनास आल्यास तत्काळ पुतळ्याची दुरूस्ती करावी, अशा सूचना स्थापत्य विभागाच्या सर्व कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत.

- मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest