संग्रहित छायाचित्र
पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. महामेट्रोकडून निगडी आणि आकुर्डी येथील मेट्रो स्थानकांच्या फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे. पुढच्या टप्प्यात चिंचवड येथील स्थानकाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. अडीच वर्षात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मेट्रो प्रशासनाने ठेवले आहे.
स्वारगेट ते पिंपरी महापालिका हा मार्ग पुढे निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढवावा, अशी नागरिकांकडून सातत्याने मागणी केली जात होती. या विस्तारित मार्गाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने २३ ऑक्टोबर २०२३ रोजी मान्यता दिली होती.
त्यानंतर पुणे मेट्रो प्रशासनाने १६ डिसेंबर रोजी बांधकामाची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानुसार या कामाला आता सुरुवात झाली होती. भक्ती-शक्ती चौक आणि पवळे पूल येथे बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. सुरुवातीला माती परीक्षणाचे कामकाज सुरू करण्यात आले. या मार्गावर चिंचवड, आकुर्डी, निगडी प्राधिकरण आणि भक्ती-शक्ती चौक या स्थानकांचा समावेश असणार आहे.
सध्या महामेट्रोकडून सर्वच कामांना गती दिली आहे. निगडी येथील भक्ती-शक्ती चौक आणि आकुर्डी येथील मेट्रो स्थानकाचे काम झाले आहे. या दोन्ही ठिकाणचे फाउंडेशनचे कामकाज पूर्ण करण्यात आले आहे. आता चिंचवड येथील स्थानकाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
यासह सध्या निगडीपर्यंत पिलर उभारण्याच्या कामालादेखील सुरुवात करण्यात आली आहे. या कामांसाठी दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. वाहतुकीला अडथळे येऊ नयेत, यासाठी वाहतूक शाखेला नियोजन करण्याबाबत कळविण्यात आले असल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले. अडीच वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्देश असल्याचे मेट्रो प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.