संग्रहित छायाचित्र
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेनंतर आता पुणे जिल्ह्यात आणखी एका महापालिकेची स्थापना होणार आहे. चाकण नगर परिषद, आळंदी नगर परिषद आणि राजगुरू नगर परिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महापालिका निर्माण केली जाणार आहे.
तीन नगर परिषदांची मिळून स्वतंत्र महापालिकेची स्थापना करावी, असा अभिप्राय जिल्हा परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने शासनाला दिला आहे. त्यामुळे चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर नगर परिषदा मिळून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याच्या हालचालींना वेग येणार आहे.
खेड तालुक्यातील चाकण, राजगुरुनगर, आळंदी नगर परिषद हद्दवाढीचे घोंगडे मागील सात ते आठ वर्षांपासून भिजत पडलेले आहे. या तिन्ही नगर परिषदांची आणि लगतच्या गावांची एकच महापालिका करण्याचे प्रयत्न राज्य शासनाकडून सुरू झाले आहेत. नवीन महापालिका करण्यासाठी राज्य शासनाने विभागीय आयुक्तांना अहवाल आणि अभिप्राय पाठविण्याचे निर्देश दिले होते.
खेड तालुक्यातील या तिन्ही नगर परिषदा तसेच लगतच्या परिसरात आसपासच्या गावांचे एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या, हद्द इत्यादी तपशील घेऊन त्यांच्याकरिता एक स्वतंत्र महापालिका स्थापन होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे, जिल्हाधिकारी पुणे, महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व आयुक्त पिंपरी-चिंचवड महापालिका, आयुक्त पुणे महानगरपालिका, मुख्याधिकारी चाकण, आळंदी व राजगुरुनगर नगर परिषद यांच्याकडून अहवाल आणि अभिप्राय मागवण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने सकारात्मक अहवाल पाठविला आहे. महापालिकेचे क्षेत्रफळ मोठे आहे. वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरविताना महापालिकेवर ताण येत आहे. या भागातील गावे महापालिकेत समाविष्ट करणे शक्य नाही. त्यामुळे चाकण, राजगुरुनगर, आळंदी नगर परिषदांची मिळून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्यास कोणतीही हरकत नसल्याचा अभिप्राय पिंपरी महापालिकेने दिला आहे. तसा दुजोरा महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांनी दिला आहे.
जिल्हा परिषद प्रशासनानेही अभिप्राय पाठविला आहे. त्यामुळे चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर नगर परिषदा मिळून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याच्या हालचालींना गती मिळाली आहे.