संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड शहरात चिंचवड, निगडी, आळंदी आणि भोसरी येथे चार अपघात झाले. यातील दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर इतर दोन अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी शनिवारी (दि. २८) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
भरधाव जाणाऱ्या दुचाकीने (एमएच १४/एचएच १४३१) एका दुचाकीला (एमएच १४/एचजे १२१६) धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. २७) सकाळी आठ वाजता मोहननगर चिंचवड येथे घडला. सचिन माणिक डेंगाळे (वय ३६, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बुलेट चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेगात जाणाऱ्या डंपरने दुभाजकाला धडक दिल्याची घटना शनिवारी (दि. २८) सकाळी अकरा वाजता भक्ती शक्ती उड्डाणपुलावर घडली. यामध्ये डंपरचालक जखमी झाला आहे. डंपरचालक छोटेलाल तायरा रावत (वय ५७, रा. निगडी), मिश्रीलाल फत्तेलाल कोल (वय २८, रा. निगडी) यांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उसाच्या शेतात काम करणाऱ्या कामगाराचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. २८) सकाळी साडेदहा वाजता घडला. बप्पासाहेब विठ्ठल खनाळ (वय ४५, रा. बीड) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी बप्पासाहेब यांचा मुलगा संदीप खनाळ यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रकचालक महेंद्र पोपट कोळेकर (रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोसरी येथून पिंपरी येथे कामावर जाणाऱ्या वृद्ध व्यक्तीच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने भोसरी एमआयडीसीमधील सदिच्छा चौकात धडक दिली. या अपघातात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. विठ्ठल गेनू तनपुरे (वय ७२) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.