Pimpri-Chinchwad : नवीन वर्षात मालमत्ताकर थकबाकीदारांवर जप्तीची टांगती तलवार

नव्या वर्षात पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांवर मालमत्ता जप्तीची टांगती तलवार असणार आहे. महापालिकेने नियमितपणे कर भरणाऱ्या व कोणत्याही प्रकारची थकबाकी असणाऱ्या ३९ हजार ५७५ मालमत्ताधारकांना ३१ डिसेंबरअखेर कराचा भरणा करण्याचे आवाहन केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 30 Dec 2024
  • 04:29 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

थकबाकीदारांना २ जानेवारीपासून जप्तीपूर्व नोटीस देणार, १३ जानेवारीला जप्तीची मोहीम होणार सुरू

नव्या वर्षात पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांवर मालमत्ता जप्तीची टांगती तलवार असणार आहे. महापालिकेने नियमितपणे कर भरणाऱ्या व कोणत्याही प्रकारची थकबाकी असणाऱ्या ३९ हजार ५७५ मालमत्ताधारकांना ३१ डिसेंबरअखेर कराचा भरणा करण्याचे आवाहन केले आहे. दिलेल्या मुदतीत भरणा न केल्यास अशा मालमत्तांना २ जानेवारी २०२५ पासून जप्तीपूर्व नोटीस बजावण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मालमत्ता १ जानेवारी २०२५ पासून जप्ती कारवाईस पात्र असणार आहेत. त्यामुळे नियमित कर भरणाऱ्या पण सरत्या वर्षात कर न भरणाऱ्या नागरिकांवरही जप्तीची टांगती तलवार असणार आहे.

महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाने नुकतीच प्रत्येक विभागीय कार्यालयांच्या प्रशासन अधिकाऱ्यांची कर वसुलीसाठी आढावा बैठक घेतली. प्रत्येक विभागीय कार्यालयांतर्गत असणाऱ्या थकबाकीदारांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये नियमितपणे कर भरणाऱ्या व कोणत्याही प्रकारची थकबाकी नसणाऱ्या ३९ हजार ५७५ मालमत्ताधारकांची आकडेवारी समोर आली. त्यामुळे अशा मालमत्ताधारकांनी  ३१ डिसेंबरपूर्वी २०२४ च्या मालमत्ताकराचा भरणा करावा अन्यथा ९ जानेवारीपासून अशा मालमत्तांच्या जप्तीचे अधिपत्र काढण्यात येऊन त्या मालमत्ता कोणत्याही वेळी जप्त करण्याचे अधिकार करसंकलन विभागीय कार्यालयाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानंतर १३ जानेवारीपासून मालमत्ता जप्तीची प्रत्यक्ष कारवाई सुरी करण्यात येणार आहे.

शहरामध्ये ६ लाख ३० हजार २९४ नोंदणीकृत मालमत्ता आहेत. चालू आर्थिक वर्षामध्ये ४ लाख ०८ हजार २२३ मालमत्ताधारकांनी आत्तापर्यंत ५५९ कोटींचा कर भरला आहे. करसंकलन विभागाकडून मालमत्ताधारकांना मालमत्ताकराचे बिल पहिल्या तिमाहीमध्येच घरपोच देण्यात आले. यामध्ये ज्यांच्याकडे मार्च २०२४ पूर्वीची थकबाकी आहे. अशा थकबाकीदारांना बिलासोबतच जप्तीपूर्व नोटीसही बजावण्यात आली आहे. एप्रिल ते जूनअखेर ३ लाख ५३ हजार ६६७ इतक्या मालमत्ताधारकांनी जागरूकपणे कर भरून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे. नियमितपणे कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांपैकी ज्यांच्याकडे फक्त चालू वर्षाचा कर येणे बाकी आहे अशा ५०,५२६ इतक्या मालमत्ता आहेत.  सदर मालमत्तांपैकी १०,९५१ मालमत्ताधारकांनी अद्यापपर्यंत १०.७८ कोटींचा कर भरला असून ३९,५७५ मालमत्ताधारकांनी अद्यापही चालू वर्षाच्या कराचा भरणा केलेला नाही. चालू आर्थिक वर्षाच्या देय मालमत्ता कर बिलातील पहिली सहामाहीची रक्कम सप्टेंबरअखेर व दुसऱ्या सहामाहीची रक्कम ३१ डिसेंबरपूर्वी भरण्याची मुदत आहे. या विहित मुदतीनंतरही ज्या मालमत्तांनी कराचा भरणा केलेला नाही अशा मालमत्ता जप्ती कारवाईस पात्र ठरतात. त्यामुळे त्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.  

लाख मालमत्तांच्या जप्तीची नोटीस

करसंकलन विभागाकडून सध्या ३ लाखांहून अधिक थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांचे जप्ती अधिपत्र काढण्यात आले असून अशा मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यासाठी जप्ती मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासोबतच, फक्त चालू वर्षाचा मालमत्ताकर डिसेंबर अखेर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ताही जानेवारीपासून थकबाकीदारांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात येणार असून सदर मालमत्तासुध्दा मालमत्ता जप्तीस पात्र होणार आहेत.

टक्क्यांचे विलंब शुल्क टाळण्याचे आवाहन

करसंकलन विभागाकडून सध्या मालमत्ता जप्तीची मोहीम, वाढणारे विलंब शुल्काबाबत विभागाकडून वेळोवेळी माहिती वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यासोबतच एसएमएस, टेलिकॉलिंग, सोशल मीडियासारख्या आदी माध्यमातून कळवण्यात येत आहे. तरी, मालमत्ताधारकांनी त्वरित मालमत्ताकराच्या थकीत रकमेचा भरणा करून मालमत्ता जप्तीची कटू कारवाई व प्रतिमहिना वाढणारे २ टक्क्यांचे विलंब शुल्क टाळण्याचे आवाहन करसंकलनन विभागाकडून करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ताधारकांमध्ये नियमितपणे कर भरणाऱ्या करदात्यांनी कायमच करसंकलनामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे. परंतु अद्यापही ज्या मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला नाही अशा मालमत्ताधारकांनी ३१ डिसेंबर रोजीपर्यंत आपल्या कराचा भरणा करून वाढणारे २ टक्क्यांचे विलंब शुल्क व मालमत्ता जप्तीची कारवाई टाळून शहराच्या विकासामध्ये हातभार लावावा.

-प्रदीप जाभंळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

करसंकलन विभागाने थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यासाठी मालमत्ता जप्ती मोहिमेला सुरुवात केली आहे. नियमितपणे कर भरणाऱ्या तब्बल ३९,५२६ मालमत्तांनी ३१ डिसेंबरअखेर कराचा भरणा करावा अन्यथा विभागाकडून सदर मालमत्तांना जप्तीपूर्व नोटीस बजाविण्यात येऊन कराचा भरणा करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात येऊन त्यानंतरही कर न भरणाऱ्यांचे जप्ती अधिपत्र काढून मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. नागरिकांनी ३१ डिसेंबरअखेर आपला कर भरून कारवाई टाळावी.

-अविनाश शिंदे, साहाय्यक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Share this story