संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड शहरात वायू, ध्वनी, नदीचे जलप्रदूषण वाढले आहे. दिवसेंदिवस धुळीचा त्रास वाढतच आहे. वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शहरात स्वच्छ व शुध्द हवा करण्यात येत आहे. मात्र, हवा, ध्वनी, जलप्रदूषण करणाऱ्यांवर सुरुवातीला दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच वारंवार सूचना करूनही प्रदूषण करणार्यांवर वेळ प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा महापालिका अधिकाऱ्यांनी दिला आहे.
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरात अनेक चौकात एअर प्युरिफिकेशन सिस्टीम बसविण्यात आली आहे. सभोवतालची हवा स्वच्छ करण्यासाठी व हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो. यामुळे चौकातील ५० मीटर त्रिजेमधील वायुप्रदूषण कमी जात आहे. नऊ पातळ्यांवर गाळण्याची प्रक्रिया पद्धत वापरली जात आहे. सभोवतालच्या हवेचे ऑनलाइन निरीक्षण करण्याची सुविधा दिली आहे.
शहरात ड्राय मिस्ट बेस्ड फाउंटन सिस्टीम ही यंत्रणादेखील २३ ठिकाणी बसविण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे उच्चदाब पंप व विशेष नोजल वापरून धुके तयार करण्यात येतात. हवेतील धूलिकण जड बनवून कमी केले जात आहेत. ते जमिनीवर खाली आणले जाते. त्यामुळे जवळच्या भागात कण उडण्यास प्रतिबंध होतो. हवेची आर्द्रता, तापमान कमी होते. वातावरण थंड राहण्यास मदत होते.
तसेच शहरात वाहनांमधून निघणार धूर, हवेतील धूलिकण यामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी स्टेशनरी फॉग कॅननची पाच वाहने मोशी कचरा डेपो येथे कार्यान्वित आहेत. धूळ व गंध नियंत्रणासाठी वॉटर मिस्ट टेक्नॉलॉजी अंतर्गत ती डिझाइन केली आहेत. ही वाहने हवेतील धूळ कमी करतात. पोर्टेबल असल्याने कोणत्याही ठिकाणी ही वाहने ओढून नेता येऊ शकणारी आहेत.
शहरातील १८ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर ट्रक मॉन्टेड फॉग कॅनन या पाच वाहनांद्वारे पाण्याचे तुषार उडवून हवेतील धूळ व धूर कमी केला जात आहे. वॉटर मिस्ट तंत्रज्ञान वापरून मोबाईल डस्ट सप्रेशन व्हेईकल म्हणून डिझाईन केलेले हे वाहन आहे.
रस्त्यांवरील जंक्शन, इमारती पडणे, कचराकुंड्यांच्या परिसरातील हवेतील धूळ नियंत्रित करण्यासाठी ही वाहने वापरली जातात. तसेच, झाडांवर साचलेली धूळ ही या वाहनांद्वारे पाण्याचे तुषार फवारून खाली बसविली जात आहे.
रोड वॉशरच्या दोन वाहनांद्वारे शहरातील १८ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीचे रस्ते साफ केले जात आहेत. बांधकाम राडारोडा वाहतूक करणार्या वाहनांतून पडलेली माती व चिखल या वाहनांद्वारे साफ केली जाते. एका शिफ्टमध्ये ४० किलोमीटर अंतराचा रस्ता धुऊन घेतला जातो. रस्त्यांसोबत पुतळे व उपकरणे धुण्यास हे वाहन वापरले जात आहे. या सर्व वाहनांना किलोमीटरनुसार पैसे दिले जातात.
या सर्व वाहने व कामासाठी ३० कोटींपेक्षा अधिकचा खर्च महापालिकेने केला आहे. त्याद्वारे शहरातील वायुप्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, असे करूनही प्रदूषण कमी होत नसल्याचे महापालिका अॅक्शन मोडमध्ये आली आहे. शहरात प्रदूषण करणार्यांवर दंडात्मक कारवाई तीव्र केली आहे. प्रसंगी फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. कारवाईसह जनजागृतीवर भर दिला आहे.
शहरात रात्रीच्या वेळेत बांधकामास बंदी
शहरात रात्री १० ते सकाळी ७ या वेळेत बांधकाम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. वायू व ध्वनिप्रदूषण होत असल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. हा नवीन नियम बांधकाम परवानगी विभागाने लागू केला आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. प्रदूषण करणार्यांवर कारवाई करण्यासाठी दोन खासगी एजन्सींचे चार पथके शहरात दिवस-रात्र फिरत आहेत. त्या पथकांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात राहण्यास मोठी पसंती दिली जात आहे. लोकवस्ती वाढत असल्याने सर्वत्र टोलेजंग गृहप्रकल्प उभे राहात आहेत. खासगी वाहनांची संख्याही वाढली आहे. बांधकामे व बेसुमार वाहनांमुळे शहरातील हवा खराब झाली आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून महापालिकेस वाहने तसेच, चौकाचौकांत लावण्यासाठी यंत्रे लावण्यात आली आहेत. प्रदूषण करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. प्रदूषण करणार्या नागरिक, संस्था, कारखाने व व्यावसायिकांवर कारवाई केली जात आहे. - संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण व जलनिस्सारण विभाग, महानगरपालिका.