PMPML News : दिव्यांग, ज्येष्ठ, गरोदर महिलांना पुढील दरवाजातून प्रवेश देण्याबाबत पीएमपीचा आदेश, मात्र कार्यवाही होईना!

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) मध्ये दिव्यांग, अंध, ज्येष्ठ नागरिक व गरोदर महिला यांना पुढील दरवाजातून प्रवेश दिला जाणार आहे. याबाबत नव्याने आदेश काढला असला तरी अद्याप त्यावरती नेमकी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 30 Dec 2024
  • 04:35 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) मध्ये दिव्यांग, अंध, ज्येष्ठ नागरिक व गरोदर महिला यांना पुढील दरवाजातून प्रवेश दिला जाणार आहे. याबाबत नव्याने आदेश काढला असला तरी अद्याप त्यावरती नेमकी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने पुन्हा हा आदेश कागदावरच राहणार असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, हा आदेश प्रभावीपणे राबवण्यात यावा अशी मागणी होऊ लागली आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत दररोज साधारण ८ ते १० लाख प्रवाशांना बससेवा दिली जाते. यामध्ये विद्यार्थी, महिला, चाकरमान्यांची संख्या अधिक आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सवलतीच्या दरात पास दिले जातात. बसमध्ये दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना राखीव आसने आहेत. मात्र, या आसनांवर बऱ्याच वेळा इतर प्रवासी बसतात. त्यामुळे बसमध्ये इतर प्रवासी आणि त्यांच्यात वाद होतात. त्याचप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी अनेकदा त्यांना बसताना अडचणी येतात. त्यामुळे बस पुढे निघून जाते. 

राखीव आसनांवर जागा द्या 

प्रशासनाने दिव्यांग, अंध, ज्येष्ठ नागरिक व गरोदर महिलांना पुढील दरवाजाने प्रवेश देऊन त्यांच्यासाठी राखीव आसनांवर बसण्याकरिता वाहकांनी जागा उपलब्ध करून द्यावी, असे आदेश दिले आहेत. चालकांनी बस थांब्याजवळ व्यवस्थित उभी करावी, जेणेकरून दिव्यांग, अंध, ज्येष्ठ नागरिक व प्रवाशांची चढ-उतार व्यवस्थित व सुलभ होईल अशी दक्षता घेण्यास सांगितले आहे.

दिव्यांगांना सौजन्यपूर्वक वागणूक द्यावी, दिव्यांगांकडून चालक- वाहकांविरुद्ध तक्रारी आल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही दिला आहे. चालक-वाहक सेवकांकडून कामकाजामध्ये निष्काळजीपणा झाल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेश मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी काढले आहेत.

आगारप्रमुखांना कारवाईच्या सूचना 

दिव्यांगच तक्रारीबाबत पीएमपी प्रशासनाने दखल घेतली असून, संबंधित चालक व वाहकांवर तक्रारी प्राप्त झाल्यास आग्रा प्रमुखांना त्यावर कारवाई करावी लागणार आहे तसेच, कारवाई झालेल्याची माहिती संबंधित दिव्यांगांना कळवावी लागणार आहे. याबाबत निष्काळजीपणा आढळून आल्यास सेवकांवर कडक कारवाई करण्यासाठी इशारा देण्यात आलेला आहे.

Share this story