संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योगांमध्ये निर्माण होणार्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नाही. शहरातील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प वर्षानुवर्ष रेंगाळला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी भूमिपूजन होऊनही कामाला अद्याप मुहूर्त लागला नाही. त्यामुळे औद्योगिक पट्ट्यात सांडपाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड परिसरात ४ हजारहून अधिक लहान-मोठ्या कंपन्या सुरू आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्राप्त आकडेवारीनुसार सुमारे १ हजार औद्योगिक युनिट्स घातक सांडपाणी आणि कचरा निर्माण करतात. या युनिट्समध्ये धोकादायक सांडपाणी, कचऱ्याची कायदेशीर आणि पर्यावरणास अनुकूल पद्धतीने विल्हेवाट लावण्याची सुविधा नाही. या परिस्थितीमुळे माती आणि जलप्रदूषण होत आहे.
सांडपाणी प्रकल्पासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर गेल्या काही दशकांपासून पाठपुरावा करत आहे. त्यामुळेच भोसरी एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक टी १८८/१ येथील दीड एकर क्षेत्रात सरासरी १ एमएलडी क्षमतेचा औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पिंपरी- चिंचवड महापालिका, एमआयडीसी, पीसीएमसी सीईटीपी फाउंडेशन आणि एमपीसीबी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणार होता. या प्रकल्पाचे ८ फेब्रुवारी २०२३ मध्ये भूमिपूजन करण्यात आले. मात्र, गेल्या दोन वर्षांत पुढेच काहीच झाले नाही.
महापालिका उचलणार ६५ टक्के खर्चाचा भार
या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्याचे कामही अर्धवट झाले आहे. या प्रकल्पाचा खर्च महापालिका ६५ टक्के भार उचलणार असून एमआयडीसी आणि एमपीसीबी प्रकल्प खर्चामध्ये अनुक्रमे २० टक्के आणि ५ टक्के योगदान देणार आहे. तसेच, औद्याेगिक युनिट्स प्रकल्प खर्चाच्या उर्वरित १० टक्के योगदान देणार आहेत.
प्रकल्पासाठी लागणार चार एकर जागा
औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी एमआयडीसीने नाममात्र दराने प्लॉट क्रमांक टी १८८/१ येथे दीड एकर क्षेत्र उपलब्ध करून दिले आहे. मात्र, या प्रकल्पासाठी दीड नव्हे तर चार एकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी उद्योजकांकडून मंगळवारी (दि. २४) उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत केली. त्यामुळे प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतर आता दीड एकर नाहीतर चार एकर जागा लागेल, असा साक्षात्कार झाला आहे.