संग्रहित छायाचित्र
निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातून पुणे-नाशिक आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गाला जोडणाऱ्या त्रिवेणीनगरमधील रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने शहराच्या वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होणार आहे. मात्र, या प्रकल्पातील मंजूर आराखड्यातील २५० मीटर लांबीच्या जमीन भूसंपादनाच्या ताब्याचा प्रश्न मिटल्यानंतरच हा रस्ता पूर्ण होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत सुरू केलेल्या कामावर भूसंपादनाअभावी अर्धवट राहण्याची टांगती तलवार लटकत आहे.
या रस्त्यामुळे शहरात मुख्य रस्त्यांवरील अवजड वाहनांची संख्या कमी होणार आहे. यामुळे पर्यावरणपूरक वातावरण टिकवून ठेवण्यास मदत मिळणार असून, वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांच्या वेळेची, तसेच इंधनाची बचत होणार आहे. मंजूर विकास आराखड्यानुसार हा रस्ता ७५ मीटर रुंदीचा असून, सद्य:स्थितीत ३७ मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्याचे काम सुरू आहे. त्रिवेणीनगर मार्गे भक्ती-शक्ती चौकातून नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या ५५० मीटर लांबी असलेल्या रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून, सध्या ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामध्ये १२ मीटर रुंदीच्या दोन लेन, मध्यभागी नऊ मीटर रुंदीचा उच्च क्षमतेचा मास ट्रान्झिट रूट आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूस दोन मीटर रुंदीचे पेव्ह शोल्डर असे या रस्त्याचे नियोजन असणार आहे. सध्या दुहेरी मार्गाचे २७० मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, फक्त २५० मीटर रस्त्याचे भूसंपादन नसल्याने हे काम रखडणार असल्याची चर्चा आहे.
मुख्य रस्त्यावरील वाहनांची कोंडी कमी होऊन कमीत कमी वेळेत प्रवास सुखकर व्हावा, यासाठी निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातून राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या काही भागातील जमिनीच्या भूसंपादनाचा प्रश्न सुटल्यानंतर जलद गतीने काम पूर्ण करून हा रस्ता प्रवाशांच्या वापरासाठी खुला होईल. - प्रमोद ओंबासे, मुख्य अभियंता, महापालिका
भूसंपादनाचा विषय मार्गी लागला आहे. त्या संदर्भात महापालिकेकडून पूर्णत: उपाययोजना करण्यात आल्या आहेत. संबंधित प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. त्याचा निर्णय या आठवडाभरात होईल. - प्रसाद गायकवाड, उपसंचालक, नगररचना, महापालिका