संग्रहित छायाचित्र
विद्यार्थ्यांना भविष्यात जबाबदार नागरिक बनवण्यासाठी त्यांच्या शालेय जीवनात योग्य शिस्त लावणे गरजेचे आहे. शाळेतच विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली तर ते भविष्यात समाज आणि देशासाठी काहीतरी चांगले करू शकतात. यासाठी पिंपरी-चिंचवड ट्राफिक पोलिसांनी 'एक दिवस शाळेसाठी' ही मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमाअंतर्गत पोलिसांनी आतापर्यंत ७३ हजार ७६१ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
शहरात अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी कृत्यात सहभाग वाढत आहे, जो समाजासाठी गंभीर चिंता आहे. काही विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच 'भाईगिरी'चे आकर्षण वाटते आणि अनावधानाने ते गुन्हेगारीच्या वाटेवर जातात. याचा त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो. म्हणूनच विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणे अत्यावश्यक आहे. यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी 'एक दिवस शाळेसाठी' ही मोहीम सुरू केली आहे.
शहरातील १४ वाहतूक विभागांसाठी २० टीम तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक वाहतूक विभागाची एक टीम, वाहतूक मुख्यालय, योजना विभाग, प्रशासन विभाग यासह साहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त स्तराच्या टीम यामध्ये समाविष्ट आहेत. या टीम्स प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, सायबर गुन्हे, सोशल मीडियाचा योग्य वापर, व्यसनांपासून दूर राहणे, महिलांचा सन्मान करणे इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले जाते. या मार्गदर्शनाची नोंद करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याच दिवशी अहवाल सादर केला जातो. अहवालासोबत शाळेत मार्गदर्शन करताना घेतलेल्या दोन छायाचित्रांचाही समावेश असतो.
शाळा, विद्यार्थी, पोलीस यांचा व्हॉट्सॲप ग्रुप
या उपक्रमांतर्गत शाळा, विद्यार्थी आणि पोलीस यांच्यात व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या ग्रुपद्वारे विद्यार्थी त्यांच्या समस्या मांडतात. खराब रस्ते, काम न करणारे सिग्नल, तोडफोड यांसारख्या समस्याही विद्यार्थी पोलिसांपर्यंत पोहोचवतात.
उपक्रमाचा १७ वा टप्पा पूर्ण
'एक दिवस शाळेसाठी' या उपक्रमाचा १७ वा टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. यामध्ये ४,१४५ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आतापर्यंत या उपक्रमाअंतर्गत एकूण ७३ हजार ७६१ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले गेले आहे.
विद्यार्थी जबाबदार नागरिक आणि चांगले माणूस बनावेत, यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने 'एक दिवस शाळेसाठी' ही मोहीम सुरू केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाते. काही विद्यार्थी त्यांच्या समस्या आमच्यासमोर मांडतात आणि त्या समस्यांवर तत्काळ कार्यवाही केली जाते.
- बापू बांगर, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग, पिंपरी-चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.