फॉरेनच्या यांत्रिक सफाई मशिनचा सोस अंगाशी
रोहित आठवले
पिंपरी चिंचवड शहरातील १८ मीटर व त्यांच्या पेक्षा अधिक रुंदीचे रस्ते यांत्रिक पद्धतीने (रोड स्वीपर मशिन) साफसफाई करण्याच्या कामाचा मुहूर्त पुन्हा हुकला आहे. काम सुरू न करण्यामागे रोड स्वीपर वाहनांची आरटीओकडे नोंदणी झाली नसल्याचे कारण महापालिका देत आहे. हे काम सुरू करण्यासाठीचे १७ जुलै, १५ ऑगस्ट, ३० ऑगस्ट असे तीन मुहूर्त यापूर्वीच हुकलेले असताना आता महापालिकेने सांगितलेला गणेशोत्सवाचा मुहूर्तही हुकला आहे. त्यामुळे शेकडो कोटी रुपये खर्च करूनही रस्ते सफाई नाहीच, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाईच्या कामाची निविदा सुरुवातीपासून वादात अडकली होती. सत्ताधारी भाजपसह विरोधकांनी निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे वारंवार आरोप केले आहेत. सत्ताधारी भाजपने हा विषय तब्बल दोन वेळा सर्वसाधारण सभेत फेटाळून लावला होता. तसेच, तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पूर्ण झालेली निविदा प्रक्रियाच रद्द केली होती. प्रशासकीय राजवटीत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या कामास २७ डिसेंबर २०२२ ला स्थायी समितीची मान्यता दिली.
शहराच्या चार भागातील या कामासाठी प्रत्येक महिन्यास ४५ कोटी रुपये खर्च होणार आहे, तर एकूण ७ वर्षांसाठी ३२८ कोटी ९५ लाखांचा खर्च होणार आहे. संबंधित ठेकेदारांना मोठे व मध्यम आकाराचे रोड स्वीपर मशिन वाहने खरेदी करण्यासाठी आयुक्तांनी ९० दिवसांची मुदत दिली होती. महापालिकेऐवजी स्वतंत्र खासगी कायदेशीर सल्लागार नेमून ठेकेदारांसोबत सात वर्षे कालावधीसाठी करारनामा करण्यात आला.
ठेकेदाराला ३० जूनला वर्कऑर्डरही देण्यात आली. मात्र, दिलेल्या मुदतीमध्ये या चार ठेकेदारांना काम सुरू करता आलेले नाही. वाहने खरेदी करून आरटीओकडे नोंदणीसाठी ठेकेदारांना महापालिका प्रशासन वारंवार मुदतवाढ देत आहे. मोठ्या आकाराचे ८ व मध्यम आकाराचे ८ असे एकूण १६ रोड स्वीपर मशिन आहेत. त्यातील काही मशिन अद्याप आलेले नाहीत. ठेकेदारांना दिलेली १७ जुलैची मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली. त्यानंतर ३० ऑगस्टची आणि त्यानंतर गणेशोत्सवाची मुदत देण्यात आली. मात्र, अद्याप आरटीओकडून वाहनांची नोंदणी झालेली नाही.
आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, “सर्व वाहने शहरात दाखल झाली आहेत. एक ते दोन वाहने शिल्लक आहेत. परदेशी अत्याधुनिक वाहने असल्याने आरटीओची नोंदणी प्रक्रिया शिल्लक आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तत्काळ काम सुरू केले जाणार आहे.”
पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे म्हणाले की, “रोड स्वीपर हे परदेशी बनावटीचे वाहन आहे. त्यासाठी अनेक अर्ज भरून द्यावे लागतात. एका साध्या पत्रावर नोंदणी होत नाही. नोंदणीसाठी अद्याप आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आलेली नाहीत. तसेच, संबंधितांनी त्याबाबत पाठपुरावा केलेला नाही.”
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.