‘काही चुका झाल्या, आता सुधारणा करू’; पिंपरी-चिंचवडची तुंबई झाल्यावर आयुक्तांना उपरती
पिंपरी-चिंचवड शहर पहिल्याच पावसात तुंबले, पिंपरी, आकुर्डी, चिखली, चिंचवड भागातील अनेक सखल भागात पाणी साचून राहिले होते. त्याच बरोबर स्ट्रार्म वाॅटर लाईन, ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे पहिल्याच पावसात शहरात पाणी साचायला नको होते. अजून आम्हाला काम करण्याची गरज असून आमच्या काही चुका झाल्या आहेत. त्यात आता सुधारणा करु, याशिवाय संबंधित विभाग प्रमुखांना सक्त ताकीद दिली आहे. यापुढे अशा प्रकारे पाणी साचून राहिल्यास कारवाईचा इशारा दिल्याची माहिती आयुक्त राहूल महिवाल यांनी दिली.
शहराला रविवारी दुपारी मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. अवघ्या पाऊण तासात रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले. अचानक सुरू झालेल्या या पावसाने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांची दाणादाण उडवली. मुसळधार पावसाने शहराला झोडपले. सुमारे एक तास झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. मुसळधार पावसामुळे समोरचे दिसत नव्हते. रस्ते जलमय झाले होते. यामुळे मुंबई - पुणे महामार्गावर अनेक सखल भागात पाणी साचले होते. वाहन चालकांना मार्ग काढताना अंदाज येत नव्हता. परिणामी अनेक भागात वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्यात अनेकांच्या घरात पाणी घुसले होते. घरकुलसह काही ठिकाणी कंबरे एवढे पाणी साचले होते. त्यामुळे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापनदेखील हतबल झाले होते. पण, संबंधित जलनिस्सारण विभाग, आरोग्य विभागाकडून योग्य साफसफाई न झाल्याने पाणी तुंबल्याचे दिसून आले.
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १४८ लहान व छोटे नाले असून हे सर्व नाले तुंबले होते. बांधकामाचा राडारोडा, पेव्हिंग ब्लॉक, विटा, दगड, गोटे, कचरा यामुळे हे नाले दरवर्षी तुंबतात. या तुंबलेल्या नाल्यांमुळे पावसाळ्यात नाल्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून धोकादायक परिस्थिती निर्माण होते. मात्र, अनेक नागरिक तसेच सोसायट्या जमा झालेला कचरा थेट नाल्यांमध्ये टाकतात. या कचऱ्यामुळे नाले तुंबतात. त्यामुळे नाल्यांमध्ये कचरा टाकण्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तीन महिन्यांपासून काम
तुंबलेल्या नाल्यांमुळे पावसाळ्यात पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. साचलेल्या पाण्यामुळे अनेकदा परिसरातील रस्ते पाण्याखाली जातात. वाहतूक बंद होते. त्यामुळे यंदा महापालिकेच्या आरोग्य विभागाने जेसीबी, पोकलॅन, ट्रॅक्टर या वाहनांच्या साहाय्याने सर्व नाले सफाईचे काम हाती घेतले होते. एप्रिल महिन्यापासून नाले सफाईला सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नाले सफाई पूर्ण झाल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
रस्त्यांखालील ३६ नाल्यांची सफाई
शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते निर्मिती झाली आहे. हे रस्ते बांधताना रस्त्यांच्या खालून नाल्यांना वाट काढून देण्यात आली आहे. मात्र, वेळेवर या नाल्यांची तसेच अंडरपासची सफाई होत नसल्याने पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे यंदा या रस्त्यांखालील नाल्यांचीही सफाई करण्यात आली आहे.
अतिक्रमण, राडारोडा कधी काढणार?
महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकूण १४८ नाले आहेत. या नाल्यांची लांबी ९९.१८७ किलोमीटर एवढी आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून टाकला जणारा राडारोडा, डबर, पेव्हिंग ब्लॉक, माती, दगड, कचरा, विटा, भंगार, लाकूड, गोंधड्या, गाद्या आदी साहित्य या नाल्यांमध्ये टाकल्यामुळे हे नाले तुंबतात. नाले तुंबल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण होते.
शहरातील सर्व नाल्यांची सफाई करण्यास एप्रिल महिन्यापासून सुरुवात करण्यात आली. शहरात १४८ लहान व मोठे नाले आहेत. त्या सर्व नाल्यांची सफाई करण्यात आली आहे. तसेच रस्त्यांखालील नाल्यांचीही सफाई करण्यात आली आहे. साफसफाईचे छायाचित्रेही घेण्यात आली आहेत.
- यशवंत डांगे, सहायक आयुक्त, महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.