Water Cut : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीकपातीची संक्रांत; महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून कपातीची तयारी पूर्ण

शहरात उन्हाळ्याची वाढती तीव्रता लक्षात घेता आणि पवना धरणातील पाण्याची पातळी घटू लागल्याने महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून (Water Supply Department) सोसायट्यांना पाणी जपून व काटकसरीने वापरण्याच्या सूचना करण्यात येऊ लागल्या आहेत.

Water Cut

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीकपातीची संक्रांत; महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून कपातीची तयारी पूर्ण

१० ते २० टक्के पाणीकपात होण्याची शक्यता

शहरात उन्हाळ्याची वाढती तीव्रता लक्षात घेता आणि पवना धरणातील पाण्याची पातळी घटू लागल्याने महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून (Water Supply Department) सोसायट्यांना पाणी जपून व काटकसरीने वापरण्याच्या सूचना करण्यात येऊ लागल्या आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते, पण मार्चमध्येच शहरातील विविध भागातून पाण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यानूसार शहरात समन्यायी पाणी वाटपानूसार पाणी कपातीची तयारी पुर्ण केली असून आणखी दहा ते वीस टक्के पाणी कपात होण्याची दाट शक्यता आहे.  (PCMC) 

पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad)  शहराला पवना आणि आंद्रा धरणातून पाणी पुरवठा होत आहे. पवना धरणातून दररोज ५१० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते. आंद्रा धरणातून पहिल्या टप्प्यात ७५, तर ‘एमआयडीसी’कडून २० असे ६०५ एमएलडी पाणी शहराला देण्यात येते. तरीही शहरात पाणी टंचाई जाणवत आहे.

शहरातील सर्व भागाना पाणी मिळावे म्हणून महापालिकेच्या वतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण दरवर्षी शंभर टक्के भरते. मात्र शहराची लोकसंख्या ३० लाखांवर गेल्याने ते अपुरे पडत आहे. त्यातच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला ४० टक्के म्हणजेच २४० एमएलडी पाण्याची गळती थांबवणे अथवा कमी करणे शक्य झालेले नाही.

आंद्रा धरणातून दररोज ७५ एमएलडी येणारे पाणी कमी झाल्याने चिखली, चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, भोसरी, दिघीसह आदी परिसरात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने ‘एमआयडीसी’कडून अतिरिक्त १० एमएलडी पाणी वाढवले आहे.

पवना धरणात सध्यस्थिती ५०.९० टक्के पाणीसाठा आहे. धरणातील सध्याचा पाणीसाठा पाहता शहराला ३० जूनअखेरपर्यंत पाणीसाठा पुरेल. मात्र, उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाण्याची मागणी वाढत आहे.

शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. पुरेशा व उच्च दाबाने पाणी येत नाही. दिवसाआड पाणी येत असल्याने पाण्याची वेळ वाढवा, आम्हाला सरासरीपेक्षा कमी पाणी दिले जात आहे, यासह अनेक तक्रारी शहरातील विविध सोसायट्यांकडून येऊ लागल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने गृहनिर्माण सोसायट्यांना पाण्याचा वापर जपून करण्याच्या सूचना देण्यास सुरुवात केली आहे. त्यानूसार धरणातील पाण्याची स्थिती पाहता महापालिकेने पाणी कपातीची तयारीच सुरू केली आहे. लवकरच शहरात पाणी पुरवठा विभागाकडून पाणी कपात जाहीर करण्यात येणार आहे, असं अधिका-यांकडून सांगण्यात येत आहे.

उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाण्याची मागणी वाढत आहे. पाण्याच्या तक्रारी पण येऊ लागल्या आहेत. शहराला आंद्रा धरणाच्या निघोजे बंधाऱ्यावरून १०० एमएलडी पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. धरणातील पाणी साठा पाहता त्या ठिकाणांहून सध्या ३० ते ४० एमएलडी पाणी उचलण्यात येत आहे. त्यामुळे शहराच्या काही भागांत कमी पाणीपुरवठा होत आहे. उन्हाची तीव्रता आणि धरणातील पाणी साठा पाहून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येईल.  

- श्रीकांत सवणे, मुख्य अभियंता, महापालिका

सोसायट्यांना पाणी बचतीच्या सूचना

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्रत्येक सोसायटीच्या तक्रारीची शहानिशा केली जात आहे. पाणीपुरवठा कमी होतोय का, हे पाहून पाणीपुरवठ्याच्या विहित मानांकनानुसार पुरेसा पाणीपुरवठा आहे का, त्यांना मीटर रीडिंगप्रमाणे सरासरीने किती पाणीपुरवठा केला आहे, त्याचा तक्ता सोसायटी सभासदांना दिला जात आहे.  सोसायटीअंतर्गत काही त्रुटी आहेत का, त्या तपासून घ्याव्यात, भूमिगत टाक्या, टेरेसवरील टाक्यांची गळती, सोसायटी अंतर्गत नेटवर्कमधील गळती, याची पाहणी करावी, त्यात काही त्रुटी असतील तर योग्य त्या उपाययोजना सोसायटीकडून कराव्यात, सोसायटीअंतर्गत असलेल्या एसटीपी आणि बोअरवेलचे पाणी टाॅयलेट फ्लशिंग, उद्यान, तत्सम कामासाठी वापरावे, पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर पाण्याचा वापर करावा, जेणेकरून पाण्याची बचत होईल, अशा सूचनाही महापालिकेकडून दिल्या जात आहेत.

इलेक्ट्रिक मोटारींनी बेसुमार उपसा

शहरातील काही परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. बांधकामासाठी नळजोडणीस इलेक्ट्रिक मोटर लावून पाणी उपसा केला जातो. परिणामी परिसरात कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यातच शेकडो सदनिका असलेल्या सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांना एक किंवा दोन नळजोडण्यांद्वारे केलेला पाणीपुरवठा पुरेसा नसतो. परिणामी हे रहिवासी टँकरद्वारे पाणी मागून तहान भागवत आहेत.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest