संग्रहित छायाचित्र
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके वाजवत असलेल्या साॅफ्टवेअर इंजिनिअरला भरधाव मोटारीने धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळी न थांबता मोटार दामटत पळून गेला. रावेत येथे भोंडवे बागकडून औंध रावेत बीआरटी रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर सिलेस्टाइल सिटी सोसायटीच्या समोर असलेल्या फॅलेसिटी सोसायटीच्या प्रवेशव्दारासमोर शुक्रवारी (दि. १) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. ऐन दिवाळीत रावेत येथील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
सोहम जयेशकुमार पटेल (वय ३८), असे मृत्यू झालेल्या साॅफ्टवेअर इंजिनिअरचे नाव आहे. त्यांची पत्नी वैदेही सोहम पटेल (वय ३८, रा. फॅलेसिटी सोसायटी, सिलेस्टाइल सिटी सोसायटीच्या समोर रावेत) यांनी या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आदित्य चंद्रकांत भोंडवे (वय २३, रा. शिंदे वस्ती, रावेत) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला शुक्रवारी लक्ष्मी पूजनानंतर सोहम पटेल हे देखील सोसायटीच्या समोर फटाके वाजवत होते.