मराठ्यांचा रोष समजणारा, सगेसोयऱ्यांचा निर्णय घेणारा आमचा- मनोज जरांगे पाटील
विकास शिंदे
मराठा समाजात (Maratha Community) सरकारबद्दल प्रचंड रोष आहे. या निवडणुकीत तो नक्कीच दिसेल. कोणाला निवडून आणायचं, अन् कोणाला पाडायचं, हे समाज ठरवेल. पण एक लक्षात ठेवा, आया- बहिणीच्या अंगावरील व्रण समाजाने विसरू नये. उमेदवार होण्यापेक्षा पाडणारे बना, त्यात मोठा विजय आहे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना केले आहे.
जरांगे (Manoj Jarange Patil ) हे निगडीहून देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाला निघाले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्यासमवेत मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होता. मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी शांततेत आंदोलन केली. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले नाही. उलट स्वतंत्र प्रवर्ग करण्यात आला. त्यामुळे सरकारविरोधात मराठा समाजामध्ये शंभर टक्के रोष आहे. तो या निवडणुकीत नक्कीच दिसेल. (Lok Sabha Election 2024)
आमचा मार्ग हा राजकीय नाही. आम्हाला आरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही कुठेही उमेदवार दिला नाही, किंवा कुठल्या पक्षाला पाठिंबा दिला नाही. ही निवडणूक मराठा समाज आपल्या हातात घेईल, आणि ज्याला पाडायच आहे, त्याला नक्कीच पाडेल, मला बाजूला करण्यासाठी गृहमंत्र्यांनी अनेक प्रयत्न केलेत. परंतु, मी बाजूला झालो नाही. सध्या महाराष्ट्रात खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. आमिष दाखवून माणसं फोडली जात आहेत. हे सर्व सरकारला जड जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. (Maratha Reservation)
आरक्षण मिळाले नाही तर विधानसभा काबीज करणार
मराठा समाजाला सहा जूनपर्यंत आरक्षण न मिळाल्यास विधानसभा काबीज करणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी सांगितले. ते म्हणाले, वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आमचा संपर्क नाही. आमची मनं एक आहेत. दोन मन होऊ शकत नाही. कोणाला निवडून आणायचं हे मराठा समाज ठरवेल. पण एक लक्षात ठेवा, आई बहिणीच्या अंगावरील व्रण समाजाने विसरू नये. महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, त्यांनी मराठा समाजाला काही दिलेलं नाही. जो सगेसोयऱ्यांचा निर्णय घेईल त्याच्या बाजूने रहा, असेही जरांगे म्हणाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.