सामाजिक कार्यकर्ते ठरले गावगुंड
विकास शिंदे
छत्रपती शिवाजी महाराज जयंती, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती यासह विविध कार्यक्रमांसाठी भक्ती-शक्ती चौकात पीएमआरडीएचा भूखंड राखीव ठेवावा म्हणून जयंती उत्सव समितीकडून सनदशीर मार्गाने आंदोलने करण्यात येत आहे. याबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटून भूखंड देण्याची मागणी केलेली आहे. तसेच उच्च न्यायालयातदेखील रिट पिटिशन दाखल केलेली आहे. परंतु, पीएमआरडीएमधील आयुक्त आणि सहआयुक्त यांनी न्यायालयात प्रतित्रापत्र दाखल केले आहे. त्यात आंदोलक सामाजिक कार्यकर्त्यांना 'गुंड टोळी' म्हणून संबोधले आहे. दरम्यान, पीएमआरडीए आयुक्त, सह आयुक्त या चोर व भ्रष्ट अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिकांकडून पैसे घेऊन खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करत कोर्टाची दिशाभूल केल्याचा आरोप जयंती उत्सव समितीचे मारुती भापकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
महापालिकेत गुरुवारी (२८ मार्च) झालेल्या पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, माजी नगरसेवक सचिन चिखले, जीवन बोऱ्हाडे, सागर तापकीर, काशिनाथ नखाते, शिवाजी साळवे, रोहिदास शिवणेकर, सचिन बोऱ्हाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. मारुती भापकर म्हणाले की, निगडी येथील भक्ती शक्ती समूहशिल्प ही शहराची ओळख आहे. या पीएमआरडीए पेठ क्रमांक २४ या जागेवर २० वर्षांपासून युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे जयंती महोत्सव साजरे होतात. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो. सर्वात उंच "तिरंगा ध्वज"डौलाने फडकत असून १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला हजारो नागरिक उपस्थित असतात.
पीएमआरडीएने दीड वर्षांपूर्वी पेठ क्र. २४ येथील हा भूखंड प्लॉट पाडून ई-निविदा पद्धतीने विक्री केला. हा भूखंड कायमस्वरूपी खुला राहावा या मागणीसाठी वर्षभर लोकशाही मार्गाने आंदोलने करत आहे. पीएमआरडीचे अध्यक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे आंदोलन करून ही मागणी केली आहे. आमच्या मागणीला स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक, नागरिकांचा पाठिंबा दिला आहे. मात्र, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांना अहवाल देताना बिल्डरांकडून पैसे खाऊन खोटा व दिशाभूल करणारा अहवाल दिलेला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सर्व माहिती दिलेली नाही. पूर्वीचे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, पीएमआरडीएमध्ये विलीन करताना या विलीनीकरणाला विरोध करणारी जनहित याचिका तत्कालीन आमदार लक्ष्मण जगताप यांनी दाखल केली होती, या जनहित याचिकेचा उल्लेख त्यांच्या अहवालात ते टाळत आहेत.
तसेच पूर्वी बंगलो सिस्टीमने बांधकामे झाली होती. मात्र, आत्ता एफएसआय वाढवून बंगलो मोडून या ठिकाणी बहुमजली इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी व ज्येष्ठांना मोकळा श्वास घेण्यासाठी हा भूखंड खुला राहणे खूप गरजेचे आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे म्हणाले की, आम्ही फेब्रुवारी २०२३ पासून शांततेच्या व सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहे. मात्र, ही जागा घेणाऱ्या बिल्डरांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटिशन क्र १८५६ ही जनहित याचिका दाखल केली. या याचिकेत पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल यांच्या आदेशाने सह आयुक्त प्रवीण नारायण ठाकरे यांनी जे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दिले आहे. ते खोटे, दिशाभूल करून लबाडी करणारे आहे. आम्हा आंदोलन करणाऱ्या सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांची बदनामी करणारे आहे. या याचिकेतील पान क्रमांक २७०,२७२ वर आम्हाला गुंड, गुंडांची टोळी म्हणून आयुक्त महिवाल आणि प्रवीण ठाकरे यांनी संबोधले आहे. मात्र, या चोर व भ्रष्ट अधिकाऱ्यांनी बिल्डर्स कडून पैसे घेऊन हे प्रतिज्ञापत्र बनवून ते मुंबई उच्च न्यायालया समोर ठेवून उच्च न्यायालयाचीच दिशाभूल केली आहे. आम्ही आंदोलन करणा-या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी करून आंदोलन केले असेल तर पीएमआरडीए प्रशासनाने आमच्यावर आतापर्यंत किती गुन्हे दाखल केले आहेत काय?, नसेल तर का नाही केला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
माजी नगरसेवक सचिन चिखले म्हणाले की, भूखंडासाठी आंदोलन केलेल्या कार्यकर्त्यांची पार्श्वभूमी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती नाही. आम्ही सर्व सामाजिक व राजकीय काम करणारे आहोत. आमच्यापैकी अनेकांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आहे. आम्ही जर गुंडगिरी करत असतो तर आम्हाला सर्व संस्था, संघटना, खासदार, आमदार व नागरिकांनी पाठिंबा दिला नसता. उलट पीएमआरडीएमध्ये कोट्यवधी रुपयांचे जमीन व्यवहार होत असतात. जमिनी खरेदी विक्रीचा दलालांचा पीएमआरडीए अड्डा या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी बनवला आहे. अशा चोर व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी आम्हाला "गुंडा टोळी" म्हणणे याबाबत हसावे की रडावे हे आम्हाला कळत नाही.
कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले की, आम्ही मागील पंचवीस, तीस वर्षे सामाजिक चळवळीत काम करीत आहोत. आमच्यावर कुठेही गुंडगिरी करण्याचे केसेस दाखल नाहीत. पीएमआरडीएच्या विरोधात आंदोलन करतानाही आम्ही कधीही गुंडगिरीचा वापर केलेला नाही. अशी वस्तुस्थिती असताना पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल यांच्या आदेशानुसार सह-आयुक्त प्रवीण ठाकरे यांनी बिल्डरांकडून पैसे खाऊन मुबंई उच्च न्यायालयात दाखल केलेले या खोट्या प्रतिज्ञापत्राद्वारे आमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, आम्ही सर्व सामाजिक कार्यासाठी काम करताना आम्हाला गुंड टोळी म्हटल्याने आम्ही दुःखी व व्यथित झालेलो आहोत. आमची समाजामध्ये मोठी बदनामी झालेली आहे. त्यामुळे पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल व सह आयुक्त प्रवीण ठाकरे यांची तातडीने चौकशी करून यांच्यावर कठोरात कठोर कलमे लावून फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, अशी मागणी भक्ती - शक्ती शिव जयंती उत्सव समिती पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निगडी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.