पुणे-नाशिक महामार्गावर धावत्या शिवशाही बसला भीषण आग
धावत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर तळेगाव चौकात आज (शनिवारी) दुपारी बाराच्या सुमारास घडली. या बसमध्ये सुमारे २५ प्रवाशी होते. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची शिवशाही बस क्रमांक एच एच ०९ ई एम २६०७ ही आज दुपारी नाशिकवरून पुण्याच्या दिशेने जात होती. चाकण परिसरातील तळेगाव चौकात आल्यानंतर बसने अचानक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच चाकण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर काही मिनिटांमध्येच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
या बसमध्ये सुमारे २५ प्रवाशी होते. आग लागताच तात्काळ प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यात कोणालाही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, बसच्या चाकांचे ड्रम लायनर गरम होऊन टायरने पेट घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. बसला आग लागल्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलीसांकडून वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.