संग्रहित छायाचित्र
ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहरचना सोसायटीचे मॉडेल म्हणून देशभर गाजलेल्या ‘अथश्री’ (Athashri Society) च्या भुलभुलैयात अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी परांजपे स्कीम्सचे (Paranjape Schemes) शशांक परांजपे यांना पत्र पाठवून टाहो फोडला आहे. मजेत राहण्यासाठी म्हणून स्वत:चे घर विकून अनेक ज्येष्ठ नागरिकांनी येथे सदनिका घेतल्या. मात्र, सात वर्षे उलटूनही ताबा मिळाला नाही. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. घरभाडे आणि बँकेचा हप्ता भरण्यासाठी ७०-७५ व्या वर्षीही अनेकांना नोकरी करण्याची वेळ आली आहे.
भूगाव (Bhugaon) येथील फॉरेस्ट ट्रेल्स येथे अथश्री ‘बी’मध्ये सदनिका घेतलेल्या मिलिंद बेंबळकर यांनी शशांक परांजपे (Shashank Paranjape) यांना अनावृत्त पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘सहवास, उत्साह, प्रेम आणि समाधानाने भरलेली चार हजारापेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांची आनंदी, चैतन्यशील कम्युनिटी म्हणजेच अथश्री!’ अशी आपल्या परांजपे स्कीमची जाहिरात नेहमी समाजमाध्यमांवर फिरत असते. पण याच अथश्रीच्या भुलभुलैयात अनेक ज्येष्ठ नागरिक अडकले आहेत. २०१६-१७ मध्ये आपण म्हणत होता, अथश्रीमध्ये राहण्यासाठी या आणि फक्त मज्जा करा. सोसायटीचे व्यवस्थापन आणि देखभाल ‘अथश्री होम’ ही कंपनी करेल. नंतर मात्र तुमची भाषा बदलली.
आयुष्यभर नोकरी निमित्त जगभर फिरणाऱ्या लोकांना निवृत्तीनंतर नातेवाईकांच्या जवळपास पुण्यात राहावेसे वाटते. अशा सर्वांनाच अथश्रीचा मोह पडतो. अथश्री ‘बी २’ या नवीन सोसायटीमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांनी २०१६ मध्येच सदनिकेसाठी नोंदणी केलेली आहे . त्यांना आपण जुलै २०२१ मध्येच ताबा देणार होता. जुलै २०२२ मध्ये सुद्धा बांधकाम पूर्ण होण्याच्या दृष्टीने काहीही प्रगती नव्हती. बांधकाम बंदच होते. प्रस्तावित सोसायटीच्या सभासदांबरोबर सप्टेंबर २०२२ मध्ये पहिली बैठक झाली. त्यामध्ये साहिल परांजपे यांनी नमूद केले की, आमच्याकडे बांधकाम करायला पैसे नाहीत. नंतर मे २०२३ मध्ये आपल्याबरोबर बैठक झाली. त्यामध्ये आपणही सांगितले की, आमच्याकडे बांधकाम करायला पैसे नाहीत. तुम्ही २०१६ मध्येच ग्राहकांना बांधकामासाठी पैसे नाहीत असे का सांगितले नाही? त्यानंतरही सातत्याने ग्राहकांकडून बुकिंग कशासाठी घेतले? सेल डीडमध्ये चुकीची आश्वासने कशासाठी दिली,’’ असे अनेक प्रश्न या पत्रात विचारण्यात आले आहेत.
मुलांनी टाकलेले म्हातारे म्हणून हिणविले
‘अथश्री होम’चे भांडवलच मुळात आमच्या दोन भावांचे मिळून २० हजार रुपये आहे. आम्ही कंपनी बंद करून टाकू. आमच्याशी लढण्याची तुमची ताकद नाही. मुलांनी टाकलेले तुम्ही म्हातारे आहात, म्हणून अथश्रीमध्ये राहण्यासाठी आलेले आहात, असे हिणविले जात असल्याचे या पत्रात म्हटले आहे. एक अत्यंत हृदयद्रावक घटना यामध्ये सांगितली आहे. अथश्री ‘बी १’मध्ये सुमारे ८१ वर्षांची माउली राहते. मुलगा आणि सून डॉक्टर आहेत. ते इंग्लंडमध्ये असतात. त्यांनी अथश्री ‘बी २’मध्ये सदनिका घेण्यासाठी हप्त्याने सुमारे ३० लाख रुपये भरले होते. ‘अथश्री बी २’च्या बांधकामास बराच उशीर होत आहे म्हणून त्यांनी तेथील सदनिका घेण्याचे रद्द केले आणि अथश्री ‘बी १’ मध्येच सदनिका घेतली. त्यांचे उर्वरित पैसे देण्यास खूप चालढकल केली. कोविडकाळात ते दोघेही पती-पत्नी आजारी पडले. त्यांना आजारपणासाठी पैशाची नितांत गरज होती. त्याच काळात त्यांच्या यजमानांचे निधन झाले. त्या सतत तुमच्याकडे पैशासाठी पाठपुरावा करीत राहिल्या. त्या माउलीला व्यवस्थित चालताही येत नाही. ती माउली रस्त्यावर उभे राहून लोकांना लिफ्ट मागते. त्यांच्या गाडीत बसून तुमच्या कार्यालयात चकरा मारत असते. तुम्ही त्यांची दखलसुद्धा घेत नाही, असे मिलिंद बेंबळकर यांनी या पत्रात नमूद केले आहे.
१३ मजली इमारत बांधण्यासाठी ७ वर्षांपेक्षा अधिक काळ
७ वर्षांनंतर म्हणजे ८४ महिन्यांनंतर ( २०१६ ते २०२३ ) अजूनही तुमची १३ मजली इमारत तयार होत नाही. इमारत पूर्ण होण्यासाठी तुम्हास अजून ६ महिने म्हणजेच एकूण १० महिने लागणार आहेत. या दिरंगाईमुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. काही ज्येष्ठ व्यक्तींनी (वय ७० ते ७५ वर्षे) २०१६ पासून सदनिकेचे हप्ते भरण्यास सुरुवात केली आहे. नवीन घर घ्यायचे यासाठी त्यांनी स्वतःची राहती घरे विकली. आता त्या व्यक्ती भाड्याच्या घरात राहात आहेत. त्यांच्याकडे घरभाडे भरण्यासाठीसुद्धा आता पैसे नाहीत. त्या व्यक्ती या वयात अर्थार्जनासाठी परत नोकरी करीत आहेत. जुनी सदनिका विकून नवीन सदनिका घेण्यासाठी अनेकांनी आयकर विभागाकडे कॅपिटल गेन मिळण्यासाठी अर्ज केलेले होते. आता बांधकाम पूर्ण होण्यासाठी इतका उशीर झालेला आहे की आयकर विभागाने त्या ज्येष्ठ नागरिकांची कॅपिटल गेनची सवलतही रद्द केलेली आहे. लोकांचे त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.
जून २०२३ नंतर बैठकच घेतली नाही
जून २०२३ मध्ये आपण दोन वेळेस बैठक घेतली. त्यामध्ये महिलांचा आणि सभासदांचा सहभाग मोठा होता. महिला मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारायला लागल्या होत्या. त्या बांधकामासाठी होणाऱ्या अक्षम्य दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त करायला लागल्या. त्यामुळे त्यानंतर तुम्ही एकदाही बैठक घेतली नाहीत. तुमचे कर्मचारी बैठकीसाठी यायला लागले. पण तो प्रकार केवळ वेळ मारून नेणे आणि प्रसंग निभावून नेण्याचा होता. जून २०२३ नंतर त्या बैठकाही बंद का केल्या, असा प्रश्न शशांक परांजपे यांना पत्रात विचारण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.