Pimpri Chinchwad : नगररचना विभागात घोटाळा?

तळवडे येथील त्रिवेणीनगर चौकातून जाणा-या स्पाईन रस्त्यातील बाधित रहिवाशांना भूसंपादन कायदा धाब्यावर बसवून महापालिकेच्या (PCMC) नगररचना विभागाकडून 'छप्पर फाडके' मोबदला देण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Tue, 20 Feb 2024
  • 03:05 pm
PCMC

नगररचना विभागात घोटाळा?

भूसंपादन कायदा धाब्यावर बसवत स्पाईन रस्ता बाधितांना छप्पर फाडके मोबदला, बाधितांना नियमबाह्य प्लाॅटचे वितरण

तळवडे येथील त्रिवेणीनगर चौकातून जाणा-या स्पाईन रस्त्यातील बाधित रहिवाशांना भूसंपादन कायदा धाब्यावर बसवून महापालिकेच्या (PCMC)  नगररचना विभागाकडून 'छप्पर फाडके' मोबदला देण्यात आला आहे. शहरातील कोणताही रस्ता किंवा आरक्षित जागेचे भूसंपादन करताना तेथील जागेच्या रेडिरेकनर दरानुसार दुप्पट मोबदला दिला जातो, पण स्पाईन रोड बाधित रस्त्यातील रहिवाशांना महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रत्येकी १२५० चौरस फुटांचा प्लाॅट देण्यात आला.

विशेष म्हणजे काही रस्ता बाधितांच्या केवळ ५० ते पाचशे चौरस फुटांच्या जागा गेलेल्या आहेत. त्या बाधितांना बो-हाडेवाडी पेठ क्रमांक ११ मध्ये १२५० चौरस फुटांचा प्लाॅट दिला आहे. त्यामुळे रस्ता बाधितांना मोबदला देताना महापालिकेने भूसंपादन कायदा धाब्यावर बसवून कोट्यवधी रुपयांचे भूखंड फुकटात देऊन नगररचना विभागाचा आणखी एक घोटाळा केल्याचे उघडकीस आला आहे.  आयटी पार्क, औद्योगिक वसाहती, सर्वाधिक कामगार वास्तव्य असलेला भाग अशा तिहेरी बंधनात तळवडे परिसर अडकला होता. तळवडे, त्रिवेणीनगर, चिखली या भागात हल्ली वाहतूक कोंडी प्रचंड वाढली होती. वाहतूक कोंडीवर महापालिका आणि वाहतूक प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत होती. याकरिता तळवडेतील त्रिवेणीनगर चौकातील स्पाईन रस्ता सर्वाधिक अडथळा ठरत होता.

निगडीच्या भक्ती-शक्ती चौकातून सुरू होणारा स्पाईन रोड त्रिवेणीनगर येथे थांबला होता. या रस्त्यात बाधित होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. रस्ता बाधित घरमालकांना प्राधिकरणाकडून भूखंड महापालिकेकडे हस्तांतर करून देण्यात आला. भूखंड मिळणाऱ्या बाधितांचे घर पाडून ते जागा अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाने स्पाईन रस्ता विकसित करताना त्रिवेणीनगर चौकातील काही घरे बाधित होऊ लागली होती. त्रिवेणीनगर चौकामधील सुमारे १३२ रस्ता बाधितांचे पुनर्वसन करताना आम्हाला घरे मिळावीत, अशी रस्ता बाधित नागरिकांकडून मागणी सुरू होती.

त्रिवेणीनगर चौकातून जाणाऱ्या स्पाईन रस्ता बाधित होणाऱ्या रहिवाशांचा रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे पालिकेने ठरवले होते. त्यानुसार  १३२ रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेला पेठ क्रमांक ११ येथे भूखंड क्रमांक एक मध्ये एकूण ८४७४.७८ स्केअर मीटर, भूखंड क्रमांक दोन मध्ये एकूण २२०६.५८ स्केअर मीटर आणि भूखंड क्रमांक तीन मध्ये एकूण ६२८२.७२ स्केअर मीटर अशा क्षेत्रफळाचा भुखंड पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने (‘पीसीएनटीडीए’) महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला.

या जागेच्या बदल्यात महापालिकेच्या नगररचना विभागाने भूखंडाचे सुमारे २३ कोटी रुपये  प्राधिकरणाला अदा केलेले आहेत. या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेली प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक ११ मधील जागा यापूर्वीच प्राधिकरणाने ९ हजार ३५० प्रतिचौरस मीटर या दराने महापालिकेच्या ताब्यात दिलेली आहे. या भूखंडावर महापालिकेने स्पाईन रोड बाधितांचे पुनर्वसन हाती घेतले. रस्ता बाधितांचे पुनर्वसन करताना महापालिकेच्या नगर रचना विभागाने शासनाचा भूसंपादन कायदा धाब्यावर बसवला आहे. नवनगर प्राधिकरण, महापालिका आणि संबंधित बाधित रहिवाशी यांच्यात नियमबाह्य चुकीच्या पध्दतीने करारनामा करत ९० वर्ष तेथील १२५० चौरस फुटांचा भूखंड भाडे कराराने देण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे.

शहरातील आरक्षित जागेचे किंवा एखाद्या रस्त्यांचे भूसंपादन करताना नगर रचना विभागाकडून तेथील रेडिरेकनर जागेच्या दुप्पट मोबदला, एफएसआय किंवा टीडीआर दिला जातो. मात्र, तळवडे त्रिवेणीनगर येथील स्पाईन रस्ता बाधितांवर अक्षरश: लाखो रुपयांचा प्लाॅट दिला आहे. दरम्यान, स्पाईन रस्ता बाधित रहिवाशांमध्ये २४ ते ५०० चौरस फूट ५३ नागरिकांची जागा,  ५०० ते १००० चौरस फूट ३६ नागरिकांची जागा आणि १००० ते २००० चौरस फूट ४३ जागा गेलेली आहे. त्यामुळे ८९ रस्ता बाधितांना थेट १२५० चौरस फुटांचा बो-हाडेवाडी सेक्टर ११ मध्ये सुमारे ४० ते ५० लाखांचा प्लाॅट महापालिकेने विकत घेऊन दिला आहे.त्यामुळे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच किरकोळ जागेच्या बदल्यात ४० ते ५० लाख रुपयांचे प्लाॅट रस्ता बाधित नागरिकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे भूसंपादन कायद्याने कुठलीही प्रक्रिया न करता नगररचना विभागाने कोणत्या कायद्याने हे प्लाॅट नागरिकांना वितरित करत अधिका-यांनी कररूपी जनतेच्या पैशाची चुराडा केला, असा सवाल नागरिकांनी उपस्थित करत आहेत. 

रस्ता बाधितांच्या जागेवर बिल्डरांचा डोळा

महापालिकेच्या नगररचना विभागाने सुमारे २३ कोटी खर्च करत प्राधिकरणाकडून जागा घेऊन ताब्यात घेतली. त्यानंतर सेक्टर ११ मध्ये स्पाईन रस्त्यांने बाधित झालेल्या रहिवाशांना प्रत्येकी १२५० चौरस फूट जागा हस्तांतर करण्यात आली. यामध्ये १३२ बाधितांपैकी १०७ जागा मालकांशी पालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाने करारनामा केलेला आहे. त्या रस्ता बाधितांना भूखंडदेखील वितरित करण्यात आलेले आहेत. सदरचे भूखंड हे ९९ वर्ष कराराने जागा मालकांना दिले आहेत. त्यामुळे ते भूखंड विकता येत नाहीत. तरीही काही बाधित जागामालकांनी सदरचे भूखंड हे राजकीय नेत्यांशी संबंधित बांधकाम व्यावसायिकांना कवडीमोल दरात विकण्यात आले आहेत. त्या पैशातून जागा मालकांनी इतरत्र फ्लॅट विकत घेण्यात आले आहेत.

ज्या नागरिकांना जागा नको होती, त्यातील काही नागरिकांना घाबरून, रेड झोनच्या नोटीस देऊन त्यांची घरे पाडण्यात आली. महापालिकेने स्वतःचे धोरण आखून नागरिकांशी करारनामा करत जागा दिल्या आहेत. ज्यांची अर्धा गुंठा जागा होती, काहींची पाच गुंठे जागा होती. तर सर्वांना सरसकट १२५० चौरस फुटांची जागा दिलेली आहे. त्यात गोरगरीब नागरिकांच्या जागांवर बिल्डरांनी डोळा ठेवून त्यांच्या जागा बळकावून विकत घेतल्या आहेत. आता आम्हाला प्लाॅट मिळाला, पण पाच लाख रुपये घरे बांधकामासाठी मागितले जात आहेत.

- नीलेश चौरे, 

रस्ता बाधित नागरिक, स्पाइन रोड

स्पाईन रस्ता बाधित नागरिकांना महापालिकेने पर्यायी जागा देण्याचे धोरण ठरवले होते. आरक्षित किंवा रस्त्यांचे भूसंपादन करताना रेडिरेकनर दराच्या दुप्पट मोबदला दिला जातो. पण, स्पाईन रस्ता बाधितांना प्राधिकरणाची जागा महापालिकेकडे हस्तांतर करून हे प्लाॅट वितरित केलेले आहेत. हे धोरण मी महापालिकेत येण्याअगोदर झालेले आहे. त्या धोरणानुसार सेक्टर ११ मध्ये प्लाॅट देण्यात आलेले आहेत. त्यांचा करारनामा भूमी व जिंदगीकडून केला जात आहे.

- प्रसाद गायकवाड, उपसंचालक, नगररचना विभाग, महापालिका

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest