आरटीओचा 'सारथी' नेहमीच होतोय 'हँग'
वाहन परवान्यासाठी ऑनलाइन अपॉईन्टमेंट घेऊनही अर्जदारांना काम न झाल्याने खाली हात परत जावे लागत असल्याने, त्यांना परवान्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) 'सारथी' या संकेतस्थळावर सातत्याने व्यत्यय येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परवान्यांचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. हजारोंच्या संख्येने वाहन परवाने अडकून पडले असून, नागरिक त्रासले आहेत. (RTO Sarthi)
पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात लायसन्सच्या (परवाना) कामांसाठी पिंपरी-चिंचवडसह लगतच्या ग्रामीण भागातूनही नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. नवीन वाहन परवाना काढणे, आधीच्या परवान्याचे नूतनीकरण, डुप्लिकेट परवाना, नाव आणि पत्ता बदलणे अशा विविध कामांसाठी नागरिक येतात, तसेच काही नागरिक परवाना मिळवण्यासाठी घरूनच ऑनलाइन अर्ज भरतात. मात्र, संकेतस्थळ बंद असल्याने शेकडोंच्या वर कामे रखडली आहेत.
मागच्या आठवड्यातही सारथी संकेतस्थळ बंद होते. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी वर्ग निवांत असल्याचे पाहण्यास मिळाले. सोमवारपासून (५ फेब्रुवारी) पुन्हा या संकेतस्थळावर व्यत्यय येत आहेत. परिणामी, नागरिकांना आरटीओचे वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. सलग पाच दिवसांपासून संकेतस्थळ बंद असल्यामुळे नागरिकांची गर्दी झाली होती. ऑनलाइन अर्ज, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन, ऑनलाइन परीक्षांसह इतर विविध कामे थांबली होती. मागील काही दिवसांपासून संकेतस्थळाला अडचण येत असल्यामुळे नागरिकांना आरटीओत हेलपाटे मारावे लागत आहेत.
ड्रायव्हिंग स्कूल चालकांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट
पोर्टल बंद असल्याने नागरिकांची परवाना सोबत अन्य कामे रखडली आहेत. तसेच, या प्रलंबित कामाचा निपटारा लवकर करण्यात यावा यासाठी, आरटीओचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांची न्यू पिंपरी-चिंचवड मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने भेट घेतली. यावेळी नागरिकांनी अपॉइंटमेंट घेतली असून त्या दिवशी त्याचे काम न झाल्यास त्याला पुन्हा अपॉइंटमेंट घ्यायला लावू नये, अथवा सुट्टीच्या दिवशी वाहन परवाना संबंधित कामाचा निपटारा करावा, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश तट्टू यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.