संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवडमधील रावेत येथील सेंटोसा वॉटर पार्कमध्ये एका ६ वर्षीय चिमुकलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही साधन सामग्री न पुरवल्याच्या कारणामुळे व्यवस्थापक आणि वाटर पार्कच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ वर्षीय चिमुकली तिच्या आई आणि भावासोबत बुधवारी रावेत येथील सेंटोसा वॉटर पार्कमध्ये फिरण्यासाठी गेली होती. मात्र, दुपारी दोनच्या सुमारास चिमुकलीचा या परिसरत खेळत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेनंतर चिमुकलीच्या आईने पोलीसांत तक्रार दिली. या तक्रारीत म्हटले की, परिसरात खेळत असताना लहान मुलांसाठी लाईफ जॅकेट नव्हते. जलतरण तलाव किती खोल आहे, हे सांगणारे कोणतेही सूचना फलक नव्हते, तलावाच्या खोलवर रेलिंग बार नसल्याने ती बुडाली. चिमुकली बुडाल्यांतर घटनास्थळी जीवरक्षक देखील उपलब्ध नव्हते. सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळल्यामुळेच आपल्या मुलीचा वॉटर पार्कमध्ये बुडून मृत्यू झाल्याचा आरोप आईने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी व्यवस्थापक आणि वॉटर पार्कच्या मालकावर कलम ३०४ (अ) आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.