संग्रहित छायाचित्र
पंकज खोले
नवीन शिधापत्रिकेसह दुरुस्तीसाठी येणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता आल्या पावली पुन्हा माघारी पाठवण्यात येत आहे. निगडी येथील अ आणि ज परिमंडळ कार्यालयाची अशी स्थिती असून, कधी इलेक्शन ड्यूटी तर, कधी बैठकीच्या नावाखाली अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसतात. परिणामी, सामान्य नागरिकांची कामे होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. एवढेच नव्हे तर येथे आलेल्या नागरिकांच्या प्रश्नावर ऑनलाइन अर्ज करण्याचा अनाहूत सल्ला दिला जात असून त्यासाठी दबाव टाकला जात आहे.
निगडी येथील व्यापार संकुलमध्ये परिमंडल कार्यालयात शिधापत्रिकेची विविध कामे होतात. सकाळपासूनच येथे शिधापत्रिका नूतनीकरण, नावात बदल करणे, नवीन नाव समाविष्ट करणे, पत्ता बदलणे, स्वस्त धान्य दुकानदार बदलणे यासह उत्पन्नाबाबत आणि इतर तक्रारींसाठी नागरिक येतात. मात्र, अनेकांची कामे होत नसल्याने त्यांना नाईलाजाने मद्यस्थांना भेटावे लागते. त्यातच वारंवार बंद होणारी यंत्रणा आणि अपुरे मनुष्यबळाचे कारण सांगून नागरिकांना पुन्हा पाठवले जात आहे. अनेकदा योग्य ती कागदपत्रे जोडली नसल्याचे कारण देत अर्ज स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे लांबून येणाऱ्या नागरिकांना एका कामासाठी दहा ते बारा वेळा हेलपाटे मारावे लागत आहेत.
सध्या इलेक्शन ड्यूटी असल्याने कार्यालयात मोजकेच कर्मचारी असल्याचे दिसून आले. दुपारी १२ नंतरच कार्यालयातील प्रवेशद्वार बंद करण्यात येते. त्यानंतर आलेल्या नागरिकांना कोणतेही कारण ऐकून न घेता उद्या, परवा या असे सांगून परत पाठवले जाते. काहींना ऑनलाइन अर्ज करण्याचा उपदेश देण्यात येतो. प्रत्यक्षात ऑनलाइन सेवेबाबत अनेकजणांना पुरेशी माहिती नसल्याने त्यांना एजंटाकडे हात पसरावे लागत आहेत.
शिधापत्रिकेसंबंधित कामासाठी येणारे बहुतेकजण झोपडपट्टी वसाहत, कामगार आणि घरकाम करणारे असतात. त्यामुळे त्यांना ऑनलाईन सेवेची माहिती नसते. मात्र, त्यांना होत असणाऱ्या शंकांचे निरसन करण्यापेक्षा उपदेश देण्यामध्ये येथील कर्मचारी माहीर आहेत. अधिकारी जागेवर नसल्याने त्यांच्या हाताखाली असलेले कर्मचारी नागरिकांची कामे करण्याऐवजी इतर कामात व्यस्त असतात.
एकाची बदली, दुसरा इलेक्शनवर
निगडी येथे परिमंडल अ (चिंचवड) आणि ज (पिंपरी) अशी दोन कार्यालये आहेत. दोन्हीकडे मिळून जवळपास अडीच लाखाहून अधिक कार्डधारक आहेत. त्यात नवीन येणाऱ्यांची संख्या वेगळी. नागरिकांची कामे वेळेत व्हावी यासाठी कार्यालयात दोन वेगवेगळे अधिकारी देण्यात आले होते. मात्र, ज विभागाच्या अधिकाऱ्यांची दुसऱ्या राज्यात बदली करण्यात आली. बाकीच्या एका अधिकाऱ्याला इलेक्शन ड्यूटी देण्यात आली आहे. त्यामुळे येथील कारभार खालील कर्मचाऱ्यांच्या भरवंशावर चालला असल्याचे दिसून येते.
शिधापत्रिकेत दुरुस्ती करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून चकरा मारत आहे. मात्र, योग्य उत्तर दिले जात नाही. ऑनलाइन प्रक्रिया फारच किचकट आहे. ती शिकण्यासाठी किती दिवस जातील हे माहिती नाही.
— योगेश पाटील, पिंपरी गाव
निवडणुकीच्या कामाची जबाबदारी आहे. मात्र, तरीही नागरिकांची कामे वेळेवर होत आहेत. त्याबाबत इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
—अमोल खाडे, परिमंडल अधिकारी
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.