संग्रहित छायाचित्र
आत्तापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत पवना जलवाहिनी आणि मावळ गोळीबार प्रकरणाचे राजकीय भांडवल केले गेले. राज्यातील राजकारणाची समीकरणे बदलल्याने आता या मुद्यावर सगळ्यांचीच अळीमिळी गुपचिळी झाली आहे. कोणीही हा मुद्दा मांडण्यास तयार नाही. पवना धरणातून बंद पाइपलाइनद्वारे शुद्ध पाणी पिंपरी-चिंचवड शहरात आणण्यासाठी झालेला विरोध, आंदोलन, गोळीबार आणि या सगळ्याचे राजकीय भांडवल आत्तापर्यंत झाले असताना लोकसभा निवडणुकीत मात्र महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी हा भावनिक मुद्दा असल्याचे सांगत हात वर केले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी हा विषयच टाळला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne) आणि महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या प्रमुखांनी एकत्रित येत पत्रकार परिषद घेतली. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील ३५ लाख लोकांची तहान भागविण्यासाठी तेरा वर्षांनंतर पवना बंद पाईपलाईन योजना का रखडली आहे, असे विचारले असता, बंद पाईपलाईनमधून शुद्ध पिण्याचे पाणी शहरात आणणे शक्य होत नसल्याने हा प्रश्न भावनिक आहे. मी या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही, असे भाष्य श्रीरंग बारणे यांनी करीत एकप्रकारे हात वर केले.
पिंपरी-चिंचवड शहराला पिण्याचे पाणी पवना धरणातून उघड्या कच्च्या नाल्यांतून आणि नदीतून येते. हे पाणी वाटेत अनेक प्रकारे प्रदूषित होते. ते पिण्यास योग्य नाही. पाण्यात अनेक रोगांचे विषाणू मिसळले जातात. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यापूर्वी अनेकदा श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदांमध्ये शहराला कशाप्रकारे दूषित पाणीपुरवठा होतो हे स्वतःच अधोरेखित केले आहे.
शहराला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत क्लोरिन तसेच अन्य शुद्धीकरण केमिकल वापरून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा हा सर्वच शहरवासीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र मावळ तालुक्यातून या प्रकल्पाला विरोध होत असल्याने निवडणुकीच्या तोंडावर या प्रकल्पाबाबत बोलण्यास महायुती तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार नकार देताना दिसत आहेत.
महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांनी तर श्रीरंग बारणे यांच्याबरोबरच महायुतीच्या विविध घटक पक्षांवर हरप्रकारे टीका केली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न, प्रलंबित विकासाचे मुद्दे, रखडलेल्या योजना यावर टीका-टिप्पणी केली आहे. परंतु वाघेरे यांनी देखील पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाबाबत ब्र शब्दही काढलेला नाही. महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार मावळ तालुक्यातील किंबहुना मावळ विधानसभा मतदारसंघातील मतदान आपल्या विरोधात जाऊ नये यासाठी पिंपरी, चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना भविष्यात होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत चुप्पी साधून आहेत.
पाईपलाईनला मावळातील शेतकरी व स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला होता. त्यावेळी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होते. शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या, त्यात तीन शेतकरी शहीद झाले. या गोळीबारानंतर मावळातील शेतकऱ्यांनी ही योजनाच होऊ दिलेली नाही. मावळ गोळीबारावरून तत्कालीन भाजप- शिवसेना युतीने अजित पवारांना चांगलेच घेरले होते. अगदी जनरल डायरची उपमा दिली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर यावरून रान उठविले होते. खासदार श्रीरंग बारणे यांनीही गेल्या निवडणुकीत पार्थ पवार यांच्याशी लढताना हा मुद्दा तापविला होता. मात्र, आता सगळीच राजकीय समीकरणे बदलली आहेत.
अजित पवारांच्या मावळात सभा ?
अजित पवार (Ajit Pawar) हे सत्तेत असताना आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाच पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाला विरोध झाला होता. तेव्हा पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आंदोलक उतरले होते. या आंदोलकांना रोखताना पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा बळी गेला होता. आजही १३ वर्षांनंतर मावळमध्ये या आंदोलनाची जखम भळभळत आहे. ९ ऑगस्ट २०११ रोजी हा गोळीबार झाला होता. त्यानंतर सात वर्षांनी १८५ शेतकऱ्यांवर या प्रकरणी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात आले. तर तीन शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरी देण्यात आली. तसेच या आंदोलनानंतर अनेक निवडणुका झाल्या. आंदोलन आणि गोळीबार झाला तेव्हापासून अजित पवार हे सत्तेत आहेत. त्यामुळे मावळ मतदारसंघातील निवडणुकीसाठी अजित पवार प्रचाराला मावळ तालुक्यात येणार का आणि गोळीबाराबाबत तसेच या प्रकल्पाबाबत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पार्थ यांना बारामतीची जबाबदारी
श्रीरंग बारणे यांना विचारले असता मावळमध्ये त्यांच्या विरोधात लढणाऱ्या उमेदवारात कितपत लढत आहे ? त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, माझ्या विरोधात कोण उमेदवार आहे हे मला माहीत नाही. माझी हॅटट्रिक निश्चित आहे. सर्व घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते माझ्यासाठी प्रचार करत आहेत. पार्थ पवार यांना प्रचारासाठी आमंत्रित करणार आहे. त्यांच्या आई सुनेत्रा पवार बारामतीमध्ये निवडणूक लढवत आहेत, त्यांना तिथे जबाबदारी देण्यात आली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.