संग्रहित छायाचित्र
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कंटेनर चालकाचा अजब प्रकार समोर आला आहे. रात्रीच्या वेळी आपला कंटेनर रस्त्याच्या मधोमध लावून चालक झोपी गेल्याचा प्रकार घडला आहे. मात्र, या दरम्यान पाठीमागून येणाऱ्या गाड्यांची कंटेनला धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गाडी चालकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे.
शिवकुमार यादव असे मृत्यू झालेल्या कार चालकाचे नाव आहे. तर शरणप्पा कुबेरअप्पा कोप्पड (वय २३, धंदा ड्रायव्हर रा. मु.पो. संदिगवडा, ता. रोना जि. गदग रा. कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी कंटेनर चालकाचे नाव आहे. या प्रकरणी सतिश नारायण गड्डम (वय ४६, धंदा नोकरी रा. द-लिफ सोसायटी, फ्लॅट नं. ४०१, एच विंग येवलेवाडी, कात्रज, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चालक शरणप्पा कुबेरअप्पा कोप्पड हा रविवारी पहाटे एमएच ४६ एएफ २३७४ या क्रमांकाचा कंटेनर मुंबईवरून पुण्याच्या दिशेने घेऊन येत होता. मात्र, पहाटे ४ च्या सुमारास त्याला झोप आल्यामुळे सातारा लेनवरील पुण्यातील राजाई हॉटेलच्या समोर त्याने कंटेनर उभा केला. धक्कादायक बाब अशी होती की त्यांने कंटेवर हा रस्त्याच्या मधोमध उभा केला आणि झोपी केला.
कंटेनर रस्त्याच्या मधोमध उभा केल्यामुळे मागुन येणारी टि एन २८ बीडब्ल्यु ९५७७ व एमएच ४६ एएफ २३७४ वाहने कंटेनरला धडकून अपघात झाला. या अपघातात कार चालक शिवकुमार यादव हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर सतिष गड्डम यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर कंटेनर चालकाविरोधात कलम २७९, ३०४ (अ), मो वा का कलम १८४, १३२ (१) क, ११९/१७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी कंटेनर चालकाला अटक देखील केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.