पुणे : दोन हजार सराईतांची कुंडली तयार!; बेकायदा धंदेवाल्यांसह तेढ निर्माण करणारेही रडारवर

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील (PCMC) १७५० गुन्हेगारांसह सुमारे दोन हजारजणांची पोलिसांनी कुंडली तयार केली आहे.

Pimpri Chinchwad Police

दोन हजार सराईतांची कुंडली तयार!; बेकायदा धंदेवाल्यांसह तेढ निर्माण करणारेही रडारवर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज, बेकायदा धंदेवाल्यांसह तेढ निर्माण करणारेही रडारवर

आगामी लोकसभा निवडणुकीच्या  (Loksabha Election 2024) पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील (PCMC)  १७५० गुन्हेगारांसह सुमारे दोन हजारजणांची पोलिसांनी कुंडली तयार केली आहे. शहरातील अवैध धंदे करणारे, खासगी सावकार यांच्यावरही पोलिसांचे लक्ष असून त्यांचाही या यादीत समावेश करण्‍यात आला आहे. याशिवाय दंगे, सामाजिक कलह यातून ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्यांचीही माहिती घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. मात्र, यंदा पहिल्यांदाच पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारांची विस्तृत यादी तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तयार केलेल्या यादीत रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांचा समावेश आहे. तसेच, शहरात संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांचाही समावेश केला आहे.

गुन्हेगारांची विस्तृत यादी करण्याचे काम स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहे. गुन्हेगारांचे नाव, त्यांच्यावरील गुन्हे, शिक्षा झाली असल्यास त्याचे स्वरूप या सर्वांचा यात समावेश असणार आहे. त्यानंतर गुन्ह्याच्या स्वरूपावरून गुन्हेगारांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार, त्यांच्यावर आचारसंहितेच्या काळात प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच, अनेकांची हद्दपारी केली जाणार आहे.

निवडणुकीत दारूचा वापरही मतदारांना आकर्षित करण्यासाठी केला जातो. यासाठी मोठ्या प्रमाणात बनावट दारूचे साठे शहरात आणले जातात. त्यांची तस्करी करणाऱ्या काही टोळ्या सक्रिय आहेत. त्यांचाही समावेश यादीत आहे. याशिवाय सामाजिक कलहातून होणाऱ्या गुन्ह्यांमधील आरोपी, गुन्हेगार यांचीही माहिती जमा केली आहे. सोशल मीडियावरून सामाजिक तणाव निर्माण केल्याप्रकरणी ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे, त्यांचाही समावेश या याद्यांमध्‍ये करण्‍यात आला आहे. याशिवाय पैसे पुरवण्याचे काम काही खासगी सावकार आणि अवैध धंदेवाले करत असतात.  पोलिसांची करडी नजर आहे.

यांच्यावर अधिक लक्ष

मारहाणीचे दोन किंवा त्‍यापेक्षा अधिक गुन्‍हे दाखल असणाऱ्या १३५० गुन्‍हेगारांची यादी तयार करण्‍यात आली आहे. तसेच, चोरी, लूटमार किंवा इतर प्रकारचे गुन्‍हे दाखल असलेल्‍या ३९८ गुन्‍हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. तसेच गुन्‍हा दाखल झाल्‍यानंतर पळून गेलेल्‍या दोन हजार १२२ आरोपींची यादीही पोलिसांनी तयार केली आहे. याशिवाय न्‍यायालयाने फरार घोषित केलेल्‍या २३ आरोपींची वेगळी यादी आहे. या सर्वांवर कारवाई करण्‍यासाठी आगामी काळात काँबिंग ऑपरेशन, नाकाबंदी आदी कारवाया पोलीस सुरू करणार आहेत.

रडारवर कोण?

सराईत गुन्हेगार

खासगी सावकार

गुन्हेगारी टोळ्या

विविध तस्कर

समाजकंटक

सोशल मीडियासंबंधी गुन्हे दाखल असणारे समाजकंटक

दोन पेक्षा अधिक गुन्हे - १३५०

चोरी, लूटमार करणारे - ३९८

फरारी - २३

आगामी निवडणुका पारदर्शी तसेच दहशतमुक्त वातावरणात होतील. त्यासाठी शहरातील दोन हजारांहून अधिक गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली आहे. दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

- सतीश माने, 

सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी- चिंचवड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest