Pimpri Chinchwad : पब्लिक टॉयलेट की ठेकेदाराचा 'स्मार्ट' धंदा ?

घराबाहेर पडल्यानंतर बहुतांश जणांना स्वच्छतागृहांची समस्या भेडसावत असते. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिकांना ही चिंता अधिक भेडसावत असते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या (Pimpri-Chinchwad Smart City) वतीने पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप)

Pimpri Chinchwad

पब्लिक टॉयलेट की ठेकेदाराचा 'स्मार्ट' धंदा ?

हॉटेल, जाहिरात फलकांच्या माध्यमातून कमावणार पैसे, दोन वेळा मुदतवाढ देऊनही एकच ठेकेदार ठरला पात्र

घराबाहेर पडल्यानंतर बहुतांश जणांना स्वच्छतागृहांची समस्या भेडसावत असते. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिकांना ही चिंता अधिक भेडसावत असते.  त्यामुळे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या (Pimpri-Chinchwad Smart City) वतीने पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर २६ स्मार्ट पब्लिक टॉयलेट उभारण्यात येत आहेत. मात्र, आठ ठिकाणच्या स्मार्ट टॉयलेटचे काम पूर्ण झाले असून अद्याप १८ स्मार्ट टॉयलेट्सचे काम प्रतीक्षेत आहे. दरम्यान, महापालिकेने संबंधित ठेकेदाराला प्रतिवर्ष १ हजार शंभर रुपयेप्रमाणे जागा भाडे आकारणी करण्यात आली असून ठेकेदारांनी महत्त्वाच्या चौकातील मोक्याच्या जागेवर हाॅटेल आणि जाहिरातफलक लावून स्मार्ट धंदा मांडला आहे.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने शहरातील २६ ठिकाणी पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर स्मार्ट पब्लिक टॉयलेट बांधण्यात येत आहेत. नागरिकांना ५ रुपये दरात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. स्मार्ट पब्लिक टॉयलेट कामासाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही एकच ठेकेदार आल्याने त्याच ठेकेदाराला पात्र ठरवत काम देण्यात आले आहे. मे. मेडिनिला हेल्थ केअर प्रा. लि. या ठेकेदार कंपनीला स्मार्ट पब्लिक टॉयलेट तयार करून १५ वर्ष त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम दिले आहे. स्मार्ट पब्लिक टॉयलेट्सच्या साफसफाईची जबाबदारीही संबंधित कंपनीकडे असणार आहे. नागरिकांना ५ रुपयांत शौचालय आणि स्वच्छतागृहाची सुविधा मिळणार असल्याचा दावा स्मार्ट सिटीने केला आहे.

स्मार्ट टॉयलेटशेजारी ठेकेदाराला दोन व्यावसायिक गाळे बांधण्यास परवानगी दिली आहे. ते गाळ्यांचे भाडे तत्त्वावर देण्यात येणार आहेत. गाळ्याच्या परिसरात जाहिरातफलक लावून त्याचे देखील उत्पन्न ठेकेदाराला मिळणार आहे. 

महापालिकेने चौका-चौकातील महत्त्वाच्या जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी स्मार्ट पब्लिक टॉयलेटची सुविधा शहरात उपलब्ध करण्यात येत आहे. सर्व २६ स्मार्ट पब्लिक टॉयलेटचे काम जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, जानेवारी २०२४ उलटून गेल्यावरही स्मार्ट सिटीने केवळ ८ ठिकाणी स्मार्ट पब्लिक टॉयलेट तयार केले आहेत, तर सहा ठिकाणी स्मार्ट पब्लिक टॉयलेटचे काम सुरू आहे, तर तीन ठिकाणी टाॅयलेट काम प्रस्तावित आहे. नऊ ठिकाणी नागरिकांचा विरोध होऊ लागल्याने त्या जागा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'स्मार्ट पब्लिक टॉयलेट' हे महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक, नागरिकांच्या सोयी करता बांधण्यात येत आहेत. स्मार्ट सिटीने ठेकेदाराला केवळ जागा दिली आहे. टॉयलेटची दैनंदिन साफसफाई, पाणी व वीजपुरवठा, सुरक्षा, देखभाल व दुरुस्ती ठेकेदार करणार आहे. स्मार्ट सिटीने एक रुपयाही खर्च केलेला नाही.

– मनोज सेठिया, स्मार्ट सिटी प्रकल्प,  पिंपरी-चिंचवड

...म्हणून एकच ठेकेदार पात्र
स्मार्ट पब्लिक टॉयलेट बांधण्यासाठी स्मार्ट सिटीने ९ डिसेंबर २०२१ ला निविदा प्रसिद्ध केली होती. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने १९ जानेवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने २७ जानेवारी २०२२ ला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. त्यात एकमेव निविदा प्राप्त झाली. निविदेस दोन वेळा मुदतवाढ देऊनही एकाच ठेकेदाराने प्रतिसाद मिळाला. तीनपेक्षा कमी ठेकेदारांनी प्रतिसाद न दिल्याने ती निविदा रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवणे आवश्यक असताना, स्मार्ट सिटीने त्या एकमेव ठेकेदाराला काम बहाल केले आहे.

२६ ठिकाणी स्मार्ट पब्लिक टॉयलेट?

शहरात २६ ठिकाणच्या स्मार्ट पब्लिक टॉयलेटमध्ये एकूण १०८ सीट असणार आहेत. त्यातील ७ ठिकाणी ४ सीट तर, उर्वरित १९ ठिकाणी २ सीटची व्यवस्था आहे. निगडीच्या भक्ती शक्ती चौक, औंध फाटा, जगताप डेअरी चौक, काळेवाडी फाटा, सांगवी फाटा, रावेत चौक, अप्पू घर दुर्गादेवी टेकडी, धर्मराज चौक रावेत, बर्ड व्हॅली गार्डन, शाहूनगर अशा आठ ठिकाणी स्मार्ट पब्लिक टॉयलेट तयार करण्यात आलेली आहेत, तर चिंचवडच्या एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाखाली, मारुती मंदिराजवळ, थेरगाव डांगे चौक, आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ, चापेकर चौक, जगताप डेअरीजवळील साई चौक, काळेवाडी आदर्शनगर, जोतीबा उद्यान, नेहरुनगर न्यायालय, साने चौकातील कृष्णानगर भाजी मंडई, कुदळवाडी उड्डाण पुलाखाली, नाशिक फाटा उड्डाण पुलाखाली, केएसबी चौक, बीआरटी स्थानक, लिंक रस्ता उड्डाण पुलाखाली गावडेनगर, जाधववाडीतील क्रांती चौक, थेरगाव बोट क्‍लब, पिंपळे सौदागरमधील सेव्हन स्टार लेन या ठिकाणी स्मार्ट पब्लिक टॉयलेट बांधण्यात येणार आहेत.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest