'सुंदर शाळा' अभियानात दोन शाळांना पारितोषिक जाहीर
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या एका आणि खासगी शाळांना पारितोषिके जाहीर झाले आहेत. यामध्ये इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा या गटात निगडीतील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय प्रथम पारितोषिक तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा गटात महापालिका क्रीडा प्रबोधिनी विद्यालय उद्यमनगर, द्वितीय पारितोषिक मिळाले आहे.
राज्यातील पारितोषिक प्राप्तशाळांना उद्या ५ मार्च २०२४ रोजी मुंबईत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत समारंभात पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. 'अ' आणि 'ब' वर्गाच्या महापालिका कार्यक्षेत्रातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा गटात कात्रज येथील कै. डॉ. यशवंत गणपत शिंदे विद्यानिकेतन क्र. १९ प्रथम, पिंपरी-चिंचवड महापालिका क्रीडा प्रबोधिनी विद्यालय उद्यमनगर, पिंपरी द्वितीय, नाशिक महापालिका शाळा क्रमांक ४९ तृतीय,तर उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा गटात ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी प्रथम, सरस्वती विद्यालय हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नागपूर द्वितीय आणि न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शनिवार पेठ पुणे तृतीय स्थानी आहे. सदरील शाळांना प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह व बक्षिसांची रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे.
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमांत १ लाख ३ हजार ३१२ शाळा सहभागी झाल्या. यामध्ये ६४ हजार ३१२ शासकीय शाळा आणि ३९ हजार खासगी शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील १ कोटी ९९ लाख ६१ हजार ५८६ विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये १ कोटी ४ लाख ६४ हजार ४२० विद्यार्थी व ४ लाख ९७ हजार १६६ विद्यार्थिनींचा सहभाग होता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.