पिंपळे सौदागरमध्ये विजेचा लपंडाव सुरु; वीज पुरवठा सुरळीत करा, नाना काटे यांची मागणी

पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरात विजेचा लपंडाव सुरु आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यातच कधी दिवसा, तर कधी रात्री अचानक वीज गायब होत आहे.

संग्रहित छायाचित्र

पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरात विजेचा लपंडाव सुरु आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यातच कधी दिवसा, तर कधी रात्री अचानक वीज गायब होत आहे. वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत माजी नगरसेवक नाना काटे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे पिंपळे सौदागर, रहाटणी विभागाचे वरिष्ठ अभियंता यांच्याकडे निवेदन देत वीज पुरवठा पुर्ण क्षमतेने करुन सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. (Pimple Saudagar Electricity)

काटे (Nana Kate) यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, रहाटणी-पिंपळे सौदागर हा परिसर गावठाण व सोसायटी बहुल भाग आहे. या परिसरात घरुन काम करणाऱ्यांची  संख्या जास्त असून सध्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा देखील सुरु आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रचंड उष्णता वाढली आहे. रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरातील रात्री-अपरात्री नेहमीच लाईट जाण्याचा प्रमाण वाढले आहे. उकाड्यामुळे नागरिकांचे बेहाल आहेत.

योग्य क्षमतेने विजपुरवठा होत नसल्यामुळे व्होल्टेज कमी-जास्त झाल्यामुळे विजेवर आधारित उपकरणे नादुरुस्त होतात. यामुळे लहाणांपासून थोरांपर्यंत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होऊ लागल्याने नागरिकांच्या रोषास आम्हाला सामोरे जावे लागत आहे. या भागातील एखाद्या ठिकाणी खोदकाम करताना केबल डॅमेज झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून लवकरात-लवकर दखल घेतली जात नाही, ही खूप गंभीर बाब आहे. दरम्यान, रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरात महावितरणच्या तक्रारीचे लवकरात लवकर निराकरण करावे, विद्युत पुरवठ्याच्या सुरु असलेला लपंडाव त्वरित थांबवावा. नागरिक नियमित विज भरणा करतात. तसे त्यांना व्यवस्थित व सुरळीत वीज पुरवठा देण्यात यावा, अशीही मागणी काटे यांनी केली आहे.  

पिंपळे सौदागर, रहाटणी भागात वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. अचानक कधीही वीज गायब होवू लागली आहे. वीज गायब झाल्याने नागरिकांचे हाल होत आहे. त्यात उन्हाळ्याने नागरिक बेहाल झाले आहे. रात्री अचानक वीज गेल्यावर वेळेत कधीच येत नाही. त्याशिवाय केबल कुठे ना दुरुस्त झाल्यास तात्काळ दुरुस्ती होत नसल्याने वीज पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे विद्युत पुरवठ्याचा सुरु असलेला लपंडाव त्वरित थांबवावा. नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा करावा. 
- नाना काटे, माजी नगरसेवक, पिंपळे सौदागर  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest